माचणूरमध्ये अर्भकावर उपचार सुरु, प्रकृती स्वस्थ, अज्ञातावर गुन्हा दाखल
मंगळवेढा, दि. २३ - मंगळवेढा-सोलापूर महामार्गावरील माचणूर येथील सरपंच सुनील पाटील यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळ शनिवारी रात्री 8 वा. अंदाजे सहा दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक अज्ञात व्यक्तीने टाकून पलायन केले. याप्रकरणी मंगळवेढा पोलिसात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत अधिक वृत्त असे की, माचणूर (ता. मंगळवेढा) येथील सरपंच सुनील पाटील यांचे मंगळवेढा-सोलापूर महामार्गालगत जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यालगत शनिवारी रात्री 8 वाजता 6 दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक अज्ञात व्यक्तीने टाकून पलायन केले. दरम्यान कालांतरांने बालिकेच्या रडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. हे वृत्त ब्रह्मपूरी, माचणूर पंचक्रोशीत पसरताच एकच गर्दी केली होती.
धाडस संघटनेचे अध्यक्ष शरद कोळी यांनी ग्रामीण रूग्णालय व पोलीस ठाण्यात फोन करून या घटनेची खबर दिली. पो.नि. हारूण शेख यांनी ते बालक ग्रामीण रूग्णालयात आणून वैद्यकीय तपासणी करून घेतली. शरद कोळी यांनी सदर बालिकेला स्वतःच्या गाडीत घेऊन ग्रामीण रूग्णालयात आणले. यावेळी राजाबाई शेंबडे, मारूती डोके, कल्लाप्पा डोके, सरपंच सुनील पाटील या बालिकेसोबत होते.
वैद्यकीय अधिकारी नितीन चौंडे यांनी त्या बालिकेवर प्रथमोपचार केले. यावेळी बालकाच्या अंगास तांबड्या मुंग्या लागल्याने अंग पूर्णपणे लाल झाले होते. मात्र शरीराला कुठलीही जखम नसून बालक सुस्थितीत असल्याचे डॉ. चौंडे यांनी सांगितले. पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हील रूग्णालयातील नवजात शिशु सेंटरमध्ये ही शरद कोळी यांच्या वाहनातून नेण्यात आले.