लिसा रे यांचा महिलांना संदेश पुणे : मदतीला कोणीही नसते, कौतुकही होत नाही; तरीही महिला म्हणजे कुटुंबाची सीईओ असते. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक घाव झेलत स्वत:ला घडवा, असा सल्ला प्रसिद्ध कॅनेडियन अभिनेत्री लिसा रे यांनी महिलांना दिला. ‘लोकमत वुमेन समिट’मध्ये लिसा रे यांचे खास आकर्षण होते. ते केवळ त्यांच्या ग्लॅमरमुळे नव्हे, तर कर्करोगाशी यशस्वी झुंज देत त्यांनी पुन्हा आपलं आयुष्य कसे फुलविलं हे जाणून घेण्यासाठी. कबीर बेदी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. लिसा रे म्हणाल्या, ‘‘सर्वांत प्रथम महिला सक्षमीकरण म्हणजे काय हे निश्चित करायला हवे. जीन्स घातल्या, मॉडर्न दिसल्या म्हणजे महिला सक्षमीकरण नाही. वैयक्तिक आयुष्य कसं जगायचं हे ठरविण्याचा अधिकार तिला मिळणे हे सक्षमीकरण. ते मिळावे यासाठी प्रयत्न करायला हवा.’’‘‘ जगभरातील महिलांचे अनेक प्रश्न सारखे आहेत. भारतामध्ये एका बाजूला महिला राष्ट्रपती- पंतप्रधान झाल्या आहेत, पण बसमध्ये छेडल्या जाणाऱ्या मुलींच्या मदतीला कोणी येत नाही. अमेरिकेमध्ये आत्तापर्यंत एकही महिला अध्यक्ष झालेली नाही. हे देखील मागासलेपणाचंच लक्षण आहे. त्यामुळे देशादेशांत समस्या वेगळ्या असल्या तरी त्यातून होणाऱ्या वेदना सारख्याच असतात.’’सकारात्मक विचार करा.. मन ताजंतवानं ठेवाआपल्य कर्करोगाच्या अनुभवाबद्दल सांगताना लिसा रे म्हणाल्या, ‘‘जगण्याच्या लढाईत कधी कधी साऱ्या आशा-आकांक्षा गळून पडतात. पण संघर्षावर मात करून सकारात्मक विचार ठेवण्याची नवी उमेद मिळाली. मला ‘आण्टी’ म्हणूनही चिडवलं; पण त्यामुळे मला फरक पडला नाही. प्रत्येक महिलेने असाच सकारात्मक विचार करायला हवा. मन आणि शरीर तरुण ताजंतवानं असेल तर तुमच्या मानसिकतेवर कोणताही परिणाम होत नाही.’’
घावांवर करा नक्षीकाम जपानमध्ये एक जपानी परंपरा आहे, की घरातील मातीचे भांडे फुटले तर ते फेकून देत नाहीत. उलट चिरा गेलेल्या ठिकाणी सोन्याचे नक्षीकाम करून नवीन कलाकृती घडविली जाते. स्त्रीने आपल्यावर कितीही घाव झाले तरी त्यातून अनुत्साहित न होता प्रत्येक घाव झेलत स्वत:ला घडविले पाहिजे, असा संदेश लिसा रे यांनी दिला.