लोकमत न्यूज नेटवर्कजुन्नर : उसन्या दिलेल्या पैशावरून झालेल्या भांडणाची तक्रार पोलिसांकडे दिली, या कारणावरून तरुणांच्या दोन गटांत जुन्नर पोलीस ठाण्यासमोरच झालेल्या हाणामारीत दोन युवक जखमी झाले. पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर झालेल्या मारहाणीच्या घटनेप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे. किरण राजाराम मानकर (रा. मानकरवाडी) आणि सिद्धेश दतात्रेय शिंदे (रा. गोळेगाव) या दोन तरुणांत झालेल्या हाणामारीत हे दोघे तरुण जखमी झाले आहे. किरण मानकर याने सिद्धेश शिंदे याला उसने पैसे दिले होते व ते परत घेण्यावरून सिद्धेश शिंदे याच्या सर्व्हिस स्टेशनमध्ये गेले असता, तेथे पैसे घेण्याच्या कारणावरून दोघांत बाचाबाची झाली. या वेळी शिवीगाळ, दमदाटी, जिवे मारण्याची धमकी दिल्यावरून किरण मानकर याने सिद्धेश शिंदे, सुमन शिंदे, कल्पना शिंदे यांच्या विरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, तर किरण मानकर याने आपल्या सर्व्हिस स्टेशनमध्ये येऊन हाणामारी केल्याची तक्रार सिद्धेश शिंदे याने जुन्नर पोलिसांकडे दिली. पोलीस ठाण्यात तक्रार देते वेळेस जुन्नर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराबाहेर बाहेर उभा असलेला किरण मानकर व सिद्धेश शिंदे यांच्यात पुन्हा झालेल्या मारहाणीत दगडाने मारहाण करण्यात आली. जुन्नर पोलिसांकडे दाखल परस्परविरोधी तक्रारीनंतर भा. दं. वि. कलम या प्रकरणी या दोन्ही तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे, पद्मभूषण गायकवाड, पोलीस हवालदार देविदास खेडकर, अमोल गायकवाड हे तपास करत आहेत.
तरुणांची ठाण्यासमोरच मारामारी
By admin | Published: July 13, 2017 1:15 AM