महासत्तेचे स्वप्न पाहत असताना आपल्या समाजाचा सामाजिक चेहरा फाटलेला दिसत नाही. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या कर्नाटक सीमेवरील भ्रूण हत्याकांड हे त्याचे ढळढळीत उदाहरण आहे. म्हणून सामाजिक मन आणि सुसंस्कृत समाज म्हणजे काय असतो, याचा फेरविचार करण्याची गरज आहे.भ्रूण हत्याकांड, स्त्री-पुरुष असमान प्रमाण, लैंगिक विषमता आदी विषय नवे नाहीत. काही दशकापूर्वी याचे तीव्र पडसाद जाणवू लागले होते. विशेषत: भारताच्या तथाकथित विकसित राज्यात किंवा भागात याची तीव्रता अधिक होती. दलित, मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज आदींमध्ये याची फारशी झळ बसली नव्हती. कारण या समाजात स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही अधिक सजग आहे. याउलट सत्ता, संपत्ती आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या मानाने शेफारलेल्या समाजात भ्रूणहत्येसारखे प्रमाण अधिक वाढले आहे. सांगली जिल्ह्याच्या म्हैसाळ परिसरातील प्रकार नवा नाही. गेली दोन-तीन दशके हा प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहे. याचे भान समाजाला आणि प्रशासन किंवा शासनाला यायला हवे होते. किंबहुना ही समस्या अधिक गांभीर्याने हाताळायला हवी होती. सांगली आणि कोल्हापूर तसेच कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून ज्या भागातून कृष्णा नदी वाहते तेथे विकसित शेतीतून समृद्धी आली आहे. त्याच परिसरात हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसतो. हरयाणा, पंजाब किंवा गुजरात आदी राज्यांतही अशा प्रकारच्या विकसित भागात भ्रूणहत्याकांडातून स्त्री-पुरुष असमानतेचा समाज आकाराला आला आहे.याचा परिणाम काय झाला? सांगलीच्या जिल्हा प्रशासनाकडे सहा महिन्यांपूर्वीच या हत्याकांडाविषयी तक्रार करून लक्ष वेधण्यात आले होते. त्यांनी चौकशी करा, असा, बघा, तपासा, असा कीर्तनकारी आदेश दिला, पण त्याचे पुढे काय झाले याची माहितीच घेतली नाही. हा भाग बाजूला ठेवूया, पण या परिसरातील सामाजिक वास्तव काय दर्शविते आहे? मिरजेच्या परिसरात विवाह करण्यासाठी तरुणांना तरुणी मिळत नाहीत. म्हणून त्या इतर राज्यांतून लाख-दोन लाख मोजून विकत आणल्या जाऊ लागल्या आहेत. एका सामाजिक संस्थेने अशा लग्न केलेल्या तरुणांची यादीच तयार केली आहे. या तरुणांना विवाहासाठी मुलीच मिळत नाहीत. हा सर्व गेल्या अनेक वर्षांच्या भ्रूणहत्येच्या साखळीचा परिणाम आहे. हा समाजातील वेडावाकडा, क्रूर बदल कोणाला दिसतच नाही. कारण प्रत्येकाने चेहरे लपवून काम करायचे ठरविले आहे. सामाजिक, कौटुंबिक, लैंगिक, आरोग्य आदी प्रश्नांचे सामाजिक वास्तव काय आहे, याची माहितीच करून घ्यावी असे कोणाला वाटत नाही.मध्यंतरी एक बातमी आली होती की, शिरोळसारख्या सधन तालुक्यात अठरा हजार कॅन्सरचे रुग्ण आहेत. हे प्रमाण खूप आहे, ज्या तालुक्यात संपूर्ण दक्षिण महाराष्ट्रातील चोवीस नद्यांचे पाणी वाहते, तेथे कॅन्सरसारख्या रोगाचे प्रमाण का असावे? आरोग्य, राहणीमान, सेवनाच्या रीती, आदींचा गांभीर्याने विचार करायला नको का? रस्ते, पाणीपुरवठा योजना, धरणे, बंधारे, मोठमोठ्या इमारती झाल्या म्हणजेच विकास का? या सर्व प्रश्नांचा फेरविचार करायला हवा. म्हैसाळचे हत्याकांड हे काही आगळंवेगळं आणि पूर्वी कधी काही घडतच नव्हतं असे अजिबात नाही. १९९० पूर्वीच्या काळात या दक्षिण महाराष्ट्रात हुंडाबळीचा धमाका होता. स्टोव्ह भडकून महिला जळाली आणि मेली. सासरच्या मंडळींनी तक्रार केली. तपास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि न्यायिक व्यवस्था हा सर्व प्रकार कागदावर आणत नव्हता. मात्र, त्यांची पैसा कमाविण्याची दुकानदारी चालायची. गेल्या कित्येक वर्षांत स्टोव्ह वापरणारा एकही पुरुष भाजून मेला नाही. तो वापरताना भडका उडाला नाही; पण महिलेचा जळून मृत्यू केवळ स्टोव्हच्या भडका उडाल्याने व्हायचा. आता गॅस आला. त्यामुळे साक्षी पुराव्यास स्टोव्हसुद्धा घराघरांत नसल्याने अचानक हा प्रकार बंद पडला. हुंडाबळीचे प्रमाणही थोडे कमी झाले, पण यात स्त्रियांना काही न्याय मिळत नाही. त्यांच्यावरील अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. त्या वाढत्या अत्याचाराला आपली मुलगी बळी पडू नये, यासाठी मुलगीच जन्माला घातली नाही तर बरे नव्हे का? असाही एक विचार फाटलेल्याच चेहऱ्याच्या समाजमनात आला. परिणामी मुलगी नकोच, अशी भावना वाढीस लागली. त्यातून भ्रूणहत्याकांड अविरतपणे चालू राहिले. अनेक गावांतून असंख्य कहाण्या ऐकायला मिळतात. मणेराजुरीच्या स्मिता जमदाडे हिची कहाणी भडकलेल्या अग्नीप्रमाणे अंगावर आली म्हणून हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आला, अन्यथा गर्भलिंग चाचणीचा शोध लागल्यापासून हा प्रकार चालूच आहे. आपल्या समाजातील शिक्षित समाजाने अंधश्रद्धा, अडाणीपणा, गरिबी, दारिद्र्य, जातीयता, धार्मिक कट्टरतावाद आदींचा वापर करून समाजाला लुटण्याचा धंदा केला. यामध्ये सर्वजण सरसकट सहभागी असतात असे नाही. वास्तविक सांगली-मिरजेला उत्तम वैद्यकीय सेवेची शतकोत्तर परंपरा आहे. असंख्य नामवंत डॉक्टरांनी या परिसरातील लोकांची सेवा केली आहे. १८९४ मध्ये वॉन्लेस नावाच्या एक प्रथितयश डॉक्टराने मिशनरीवृत्तीने मिरजेत वैद्यकीय परंपरा सुरू केली. ही एक उत्तम आणि सुसंस्कृत बाजू आहे, पण आधुनिक काळात ही परंपरा समृद्ध होत असताना विकृत, भ्रष्ट व्यवस्थेची परंपरा चालविणारेसुद्धा याच मातीत जन्माला आले. याचे कारण आपले प्रशासन अधिकाधिक ढिले, भ्रष्ट आणि गैर होत चालल्याने असा वर्ग मुजोर बनत गेला.तीस वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील हुंडाबळी या प्रकरणाचा अभ्यास केला होता. पन्नास प्रकरणे तपासली होती. त्यातील केवळ तीन प्रकारात किरकोळ शिक्षा झाली होती. पन्नासपैकी निम्म्या बायका जळून मेल्या किंवा मारल्या गेल्या होत्या. तक्रार नीट घेतली नाही. तपास योग्य केला नाही. वैद्यकीय अहवाल सत्य बोलतच नाही आणि कोर्टात बाजू मांडणारे नैतिकता दाखवित नाहीत, असे या प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर स्पष्ट दिसत होते. स्त्रियांवरील अत्याचाराचा प्रवास अखंड चालू आहे, त्याची दखल गांभीर्याने घेऊन दीर्घकालीन उपाययोजना आखल्या नाहीत. अलीकडच्या काळात तरुणींच्या छेडछाडीचे प्रमाण किंवा लैंगिक अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर कठोर उपाय होत नाही. सांगलीचे पोलिस अधीक्षक दीपक सावंत बलात्काराच्या घटनांच्या तपासात पूर्ण लक्ष घालून त्यातील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करत होते. तेव्हा बलात्कारासारख्या अत्याचाराने तरुणीचे लचके तोडणारी यंत्रणा कशी कार्यरत आहे, याचा शोध त्यांनी घेतला होता. म्हणजे तपास यंत्रणा सजग झाली तरी आरोपींना जरब बसविणारी शिक्षा होईलच याची खात्री देता येत नाही. या निष्कर्षापर्यंत ते आले होते.याचाच दुसरा अर्थ असा की, आपल्या प्रशासकीय व्यवस्थेने समाजातील या सर्व बदलाचा सूक्ष्म अभ्यास करायला हवा. त्यातील क्रूरता, विकृती आदींवर आघात करण्यासाठी लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे, अन्यथा दुष्काळ पडला की, काहीजणांना आनंद होतो. म्हणून ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ या नावाने ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी पुस्तक लिहिले आहे. दुष्काळसारख्या संकटाने समाज होरपळून जात असताना त्यावर मात करण्याची भाषा करणाऱ्यांना तो आवडू लागतो. कारण त्यासाठी येणाऱ्या पैशावर डोळा असायचा. तसेच काहीसे झाले आहे. भ्रूूण हत्याकांड केवळ स्त्री जन्माची क्रूर कहाणी नाही. ही एक भीषण मानसिकता तयार झाली आहे. ती एक क्रूर व्यवस्था तयार झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुलगी नको, या निष्कर्षापर्यंत स्वार्थाने बरबटलेला समाज आला आहे. त्याचा चेहरा फाटलेला आहे. त्यामुळे दिशा समजत नाही, पण डॉक्टर, वकील, प्रशासन, प्राध्यापक, शिक्षक, लोकप्रनिधी यांनी अधिक जबाबदारी घ्यायला हवी.वास्तविक आपल्या समाजाने लोकसंख्या नियंत्रणासाठी गर्भपात हा स्वेच्छेने स्वीकारला होता. इतर अनेक धार्मिक प्रभावाखालील देशांनी गर्भपाताला कडाडून विरोध केला होता, पण आपण तो स्वीकारला होता. गर्भ टाळण्याच्या साधनांचा जाहीरपणे स्वीकार केला होता. कारण लोकसंख्येचा विस्फोट ही मोठी समस्या होती. आता ही समस्या वाढीची नाही तर असमतोल वाढीची झाली आहे, ती समस्या अधिक गंभीर आहे.स्पेन या विकसित राष्ट्राने अलीकडेच एका स्वतंत्र मंत्र्याची नेमणूक केली आहे. त्यांचे नाव आहे इडेलमारी बॅरेरिया. त्यांचे खाते आहे ‘मिनिस्टर फॉर सेक्स.’ स्पेनमध्ये जननदरापेक्षा मृत्यू दराचे प्रमाण वाढले आहे. परिणामी ही लोकसंख्या घटते आहे. ती वाढावी यासाठी लोकांनी लैंगिक संबंध वाढवावेत आणि मुलांना अधिकाधिक जन्म द्यावा असे काम या मंत्र्यांनी करायचे आहे. ही दुसऱ्या टोकाची समस्या आहे. स्पेनची जनता मुलांना जन्मच देत नाही. कारण त्यांना परवडत नाही. देशात ४८ टक्के बेकारी आहे. नोकरी मिळत नाही. स्थिरता नाही, जन्माला घातलेल्या मुलींना वाढविण्याची समस्या आहे. तरीसुद्धा आपण स्पेनला विकसित देश म्हणतो. हा कसला विकास आहे. त्याच विकासाच्या देशाच्या छायात बसणारा आपलाही कृष्णाकाठचा विकसित प्रदेश आहे का? याचा विचार करायला हवा. कारण लोकसंख्येचा आणि आपल्या सामाजिक समस्येचा प्रश्न गंभीर होत आहे. -वसंत भोसले--
भ्रूणहत्याकांड... फाटलेल्या चेहऱ्याचा समाज!
By admin | Published: March 18, 2017 11:49 PM