पुणे : बंदी असलेल्या सीपीआ माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या अरुण फरेरा यांनी पोलीस कोठडी दरम्यान तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांनी त्यांच्या कार्यालयात चौकशी दरम्यान मारहाण केली असा दावा फरेरा यांनी विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांच्या न्यायालयात मंगळवारी केला.
दरम्यान अरुण फरेरा, व्हरनॉन गोन्सालवीस आणि सुधा भारद्वाज यांना पोलीस कोठडीची मुदत संपत आल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्तात मंगळवारी न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकील उज्वला पवार यांनी संबंधित तिनही आरोपींना पोलीस कोठडीची हक्क अबाधित ठेवून 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. न्यायालयाने त्यानुसार सदर तिघांना 19 नोव्हेंबर पर्यन्त न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात यावे असा आदेश दिला. यावेळी आरोपींना कारागृहात वैद्यकीय सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली. ती न्यायालयाने मान्य केली.
फरेरांचा इन कॅमेरा जवाब अरुण फरेरा यांनी न्यायालयात सांगितले की, 4 नोव्हेंबर रोजी स्वारगेट येथील एसीपी कार्यालयात तपास अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी माझ्यासह व्हरनॉन गोन्सालवीस, सुधा भारद्वाज यांची स्वतंत्र चौकशी केली. सदर दोघांची चौकशीनंतर माझी चौकशी सुरू करण्यात आली. त्यावेळी तपास अधिकाऱ्यांनी चष्मा काढून ठेवला आणि त्यानंतर माझ्या गालावर 8 ते 10 थपडा लगावल्या. 5 नोव्हेंबर रोजी ससून रुग्णालयात तपासणी करण्यासाठी घेऊन गेले असता, डॉक्टराना मी घडलेला प्रकार सांगितला, त्यांनी अहवाल तयार करून त्यात तसे नमूद केले. दरम्यान तपास अधिकरी डॉ. शिवाजी पवार तपासाठी बाहेर गावी गेले असल्याने सुनावणीसाठी हजर राहू शकले नाही. सरकारी वकील यांनी फरेरा याचा आरोप गंभीर असून त्यांची इन कॅमरा जबाब नोंदवावा अशी मागणी केली.