पातूर (जि. अकोला): भरधाव ट्रक हॉटेलमध्ये घुसून उलटल्याने झालेल्या अपघातात २ जण जागीच ठार, तर अन्य चार जण जखमी झाल्याची घटना गुरुवार, १७ मार्च रोजी दुपारी पातूर येथे घडली. जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे.वाशिमकडून अकोला येथे मिरचीचे कट्टे घेऊन जात असलेला ए. पी. १६ टी.जी. १११६ क्रमांकाचा ट्रक पातूर शहरात येताच चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेला ट्रक पातूर पंचायत समितीजवळच्या एका हॉटेलमध्ये शिरला व तेथे उलटला. यात हॉटेल मालक गजानन सातव व चान्नी येथील वकील अनिल ताले यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश घुगे, भानुदास घुगे, अनिल इंगळे व क्लिनर व्यंकटेश हे चौघे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने सवरेपचार रुग्णालयात हलविण्यात आले. जिल्हा पोलीस उपअधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय अधिकारी विक्रांत देशमुख, ठाणेदार अनिल जुमळे, चान्नीचे ठाणेदार विष्णुकांत गुट्टे, नगराध्यक्ष हिदायत खान यांनी घटनास्थळाला भेट दिली. माझ्या बाबाला वाचवा हो..!अपघातात ठार झालेल्या हॉटेल चालक गजानन सातव यांच्या मुलीचे लग्न या महिन्यात होणार आहे. सातव हे लग्नाच्या तयारीला लागले होते. हॉटेलमध्ये बसून ते पत्रिका वाटत होते. यावेळी त्यांचा लहान मुलगाही त्यांच्यासोबत होता. ट्रक हॉटेलमध्ये घुसून उलटला. त्याखाली सातव दबले. यावेळी लहान मुलाला वडील दिसत नसल्यामुळे, त्याने माझ्या बाबाला वाचवा हो, असा आर्त टाहो फोडला. त्याच्या रडण्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते.अफवांना ऊतहॉटेलमध्ये ट्रक घुसल्याने त्याखाली आठ ते दहा जणांचा चिरडून मृत्यू झाल्याची अफवा जिल्हाभरात पसरली होती. सोशल मीडियावरून तशा पोस्टही व्हायरल झाल्या. त्यामुळे या अफवांना चांगलेच खतपाणी मिळाले. नंतर अपघातात दोन जण ठार झाल्याची माहिती समोर आली.
भरधाव ट्रक हॉटेलमध्ये घुसला; २ ठार, ४ जखमी
By admin | Published: March 18, 2016 2:17 AM