बारामती : ते राजे महाराज आहेत आम्ही सामान्य प्रजेतली माणसं आहोत. त्यामुळे ते आम्हाला मारू शकतात. तसेच उदयनराजे यांच्या डोक्यात अजूनही सरंजामशाहीच आहे. पण देशात सध्या लोकशाही आहे हे त्यांना माहीतच नाही आणि लोकशाहीत सर्वजण समान आहेत हे समजून घेण्याच्या मूडमध्ये ते नाहीत, अशी खरमरीत टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंवर केली.
सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नितिन यादव यांच्या निवासस्थानी आव्हाड यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते, सुब्रमण्यम स्वामी, योगेश सोमण यांच्यासह उदयनराजे व त्यांच्या समर्थकांचा आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. तसेच गृहनिर्माण व कर्जमुक्तीत सरकार गंभीरपणे काम करणार असल्याचे आश्वासनही दिले. उदयनराजे यांना आपण लोकशाहीपूर्ण जगात आहोत हे अजूनही लक्षात येत नाही. डा. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या घटनेनुसार सर्वजण समान आहेत. भाजपाची महाराजांबद्दलची असूया अजून संपत नाही. कालच एका भाजपाच्या आमदाराने महाराजांची उंची मोदींमुळे आणखीन वाढली असे वक्तव्य केले. भाजपाने याबाबत खुलासा करावा, असे आव्हानही आव्हाड यांनी दिले. मंदीमुळे 'बिल्डींग' उद्योगही अडचणीत आहे. या उद्योगात बिल्डरसोबत 267 प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय त्यावर जगतात. वेगवेगळ्या प्रयोगातून बिल्डर जिवंत ठेवून गरीबांना परवडतील अशी घरे मिळवून द्यावी लागतील. या इंडस्ट्रीला तीन महिन्यात सुगीचे दिवस आणण्यासाठीच साहेबांनी मला गृहनिर्माण दिले आहे. रीबांना घरासाठी मदत होणार असेल तर आक्रमकपणे या इंडस्ट्रीला जिवंत करण्यासाठी मोठ्या बँकांशी बोलतोय, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच सरकार कर्जमाफीमध्ये गंभीरपणे उर्वरीत सर्व शेतकऱ्यांना न्याय देणार आहे. दोन लाखांच्या वरील आणि नियमित कर्जदारांना मदत होणार आहे, असेही ते म्हणाले.
आव्हाड म्हणाले, तसेच सीएए, एनआरसी हा बहुजनांविरूध्दचा डाव आहे. वडील-आजोबांचे प्रमाणपत्र किंवा खापरपणजोबाची स्मशानभूमी आम्हाला सांगता येणार नाही. तुलनेने मुस्लिमांचा खानदानी कबरखाना असतो, ख्रिश्चनाचं रेकॉर्ड आहे. भटक्या विमुक्तांकडे, बहुजनांकडे काय रेकॉर्ड आहे? जमीन नाही किंवा वास्तव्याचा दाखला नाही. भाजपा असा जातीयवाद वाढवत आहे. माणसाला माणूस मानणार का नाही? असा सवाल त्यांनी केला. घटनेवर चचेर्वेळी प्रास्ताविका सुरू करताना देवाचे नाव टाकून सुरू करण्याबाबत डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी विरोध केला. जिजस, अल्ला, बुध्द अशीही नावे टाकायची का? असा सवाल केला. त्यानंतर वुई द पिपल... अशी सुरवात केली. बहुसंख्यांकवादावर दादागिरी करता येत नाही. पण अजूनही भाजपाला समाजव्यवस्था समजत नाही ते पुन्हा जातीयवाद सुरू करत आहेत. इंग्रज काळात फासेपारध्यांसाठी सेटलमेंट कँप होता. आता त्यांच्यासाठी डिटेंशन कँप काढला जात आहे. आसाममध्ये मुसलमानांना टार्गेट करायला गेले आणि एकोणीस लाखापैकी चौदा लाख हिंदू निघाले. त्यामुळे ते फसले आहेत. स्थानिक हिंदू आणि बाहेरचे यांच्यात वाद लागलाय. माणूस म्हणून जगू द्या सगळ्यांना, असा आव्हाडांनी सल्ला दिला.