पुणे : स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया आणि डेंगीनंतर आता शहरात एका अज्ञात विषाणूने डोके वर काढल्याने ऐन गणेशोत्सवाच्या काळात शहरावर या विषाणूच्या तापाचे सावट आहे. मागील १५ दिवसांपासून दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांतील अनेक रुग्ण हे डेंगी आणि चिकुनगुनिया झालेले नसून, या दोन्ही आजारांची एकत्रित लक्षणे असणारे आहेत, असे शहरातील डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे हा नव्याने आलेला विषाणू कोणता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अद्याप डेंगी आणि चिकुनगुनियाच्या विषाणूंवरही जगभरात औषध उपलब्ध नसल्याने या नवीन विषाणूमुळे डॉक्टरांना उपचार देताना अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र आहे. यावर योग्य तो आहार, जास्त प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असून, रुग्णाला तापाचे औषधही देण्यात येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले; मात्र रुग्णांनी लक्षणांवर लक्ष ठेवणे आवश्यक असून, काही वेगळी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. सध्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये दररोज नव्याने येणारे २० ते २५ रुग्ण आहेत. डेंगीसारख्या आजारात रोज किंवा दिवसाआड प्लेटलेट्सची तपासणी करावी लागते; मात्र डेंगी आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांपेक्षा वेगळ्याच विषाणूमुळे ताप असलेले रुग्ण जास्त असल्याचे दिसत आहे. यामध्ये विशिष्ट वयोगट नाही.डॉ. रमेश गोडबोले, पॅथॉलॉजी तज्ज्ञदिवसाला संसर्गजन्य आजारांचे साधारण १० लहान मुले तपसाणीसाठी येत असतील, तर त्यातील ५ ते ६ रुग्ण हे नव्याने आलेल्या एका विषाणूमुळे बाधित झाल्याचे चित्र आहे. हा विषाणू नोमका कोणता आहे हे अद्याप स्पष्ट न झाल्याने उपचार करणे काहीसे कठीण होत आहे. पुण्यात असणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने अशा प्रकारच्या प्रकरणात योग्य ते लक्ष घालून कारवाई करण्याची आवश्यकता असून, स्वाइन फ्लूच्या वेळी ज्याप्रमाणे मोहीम राबविण्यात आली, त्याप्रमाणे एनआयव्हीने मोहीम राबविली पाहिजे. - डॉ. शिशिर मोडक, बालरोग तज्ज्ञमागील काही दिवसांपासून तपासणीसाठी येणाऱ्या संसर्गजन्य आजाराच्या रुग्णाला आम्ही डेंगी आणि चिकुनगुनिया या दोन्ही आजारांच्या तपासण्या करायला लावतो; मात्र यातील ९० टक्के तपासण्यांत डेंगी आणि चिकुनगुन्या निगेटिव्ह असल्याचे दिसत आहे. यावर कोणतेही विशिष्ट औषध उपलब्ध नसल्याने योग्य तो आहार, भरपूर पाणी पिणे आणि भरपूर विश्रांती आवश्यक आहे. रुग्णांनी वेगळी काही लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे. - डॉ. विजय जगताप, जनरल फिजिशियन
ताप, सर्दी, खोकला व्हायरल
By admin | Published: September 09, 2016 2:02 AM