लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुणे या महानगरांमध्ये स्थलांतरित झालेल्या विदर्भवासीयांसाठी दिवाळी सणात गावी परतण्यासाठी रेल्वेने मोजक्याच गाड्या उपलब्ध करून दिल्याने मोठी गैरसोय होत आहे. सध्या बडनेरामार्गे केवळ २१ गाड्या धावत असून, त्यातील बहुतांश आठवड्यातून एक वा दोन दिवस आहेत. पुण्यासाठी तर केवळ तीन गाड्या उपलब्ध आहेत.
दिवाळीत गावी परतण्यासाठी सर्वाधिक गर्दी पुणे मार्गावर असते. खासगी ट्रॅव्हल्स, एसटी बसच्या तुलनेत रेल्वेला पसंती दिलीजाते. सध्या पुण्याहून परतण्यासाठी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, पुणे-अजनी एसी एक्स्प्रेस आणि पुणे-अमरावती एसी एक्स्प्रेस या तीनच गाड्या उपलब्ध आहेत. इतर गाड्या मुंबई, हावडा, अहमदाबाद या मार्गांवर धावणाऱ्या आहेत. गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, हावडा-मुंबई मेल, हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस, अहमदाबाद-चेन्नई एक्स्प्रेस या गाड्या दररोज धावत आहेत.अतिरिक्त शुल्कामुळे प्रवासी हैराणरेल्वेने विशेष गाड्यांच्या नावाखाली जुन्या गाड्यांच्या क्रमांकापुढे शून्य लावून सेवा सुरू केली. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देशभरात अप-डाऊन मार्गावर उत्सव गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्यांचे तिकीटदर विशेष गाड्यांच्या तुलनेत १० ते ३३ टक्के अधिक असल्याने दिवाळीच्या काळात रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडतो आहे.