"लोकसभेत कमी जागा लढल्या पण विधानसभेत..."; शरद पवार गटाचे काँग्रेस, ठाकरे गटाला संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 10:45 AM2024-06-22T10:45:57+5:302024-06-22T10:47:47+5:30

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. 

Fewer seats contested in Lok Sabha but picture will be different in Assembly, Sharad Pawar Uddhav Thackeray hint to Congress | "लोकसभेत कमी जागा लढल्या पण विधानसभेत..."; शरद पवार गटाचे काँग्रेस, ठाकरे गटाला संकेत

"लोकसभेत कमी जागा लढल्या पण विधानसभेत..."; शरद पवार गटाचे काँग्रेस, ठाकरे गटाला संकेत

पुणे - लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटानं सर्वात कमी जागा लढवल्या मात्र विधानसभा निवडणुकीत परिस्थिती वेगळी असेल असं शरद पवारांच्या हवाल्याने राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले. शरद पवारांनी शुक्रवारी पुण्यात २ बैठका घेतल्या. त्यात पहिली बैठक पुणे शहर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची होती तर दुसरी बैठक आमदार आणि नवनियुक्त खासदारांची होती. 

पीटीआयनुसार, पहिल्या बैठकीत सहभागी पुणे शहर शरद पवार गटाचे अध्यक्ष प्रशांत जगपात यांनी म्हटलं की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यासोबत आघाडी टिकावी यासाठी पक्षाने कमी जागांवर निवडणूक लढवली. मात्र विधानसभेला चित्र वेगळे असेल. पुणे, बारामती, मावळ, शिरुर लोकसभेत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा बैठकीत घेण्यात आला त्यामुळे विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांनी बैठकीत संकेत दिल्याचं बोललं जातं. 

तर शरद पवारांनी आमदार, खासदारांना विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पक्षाने अद्याप महाविकास आघाडीत किती जागा मागायच्या याबाबत काही ठरवलं नाही. याबाबत लवकरच आमचे नेते शरद पवार निर्णय घेतील असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं. तर मविआत कुणीही मोठा भाऊ अथवा छोटा भाऊ नाही, सर्व समान आहेत असं विधान अनिल देशमुख यांनी केले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार गटातील आमदारांमध्ये चलबिचल सुरू झालीय. त्यातील काहींनी जयंत पाटील आणि अन्य नेत्यांशी फोनवरून संपर्क साधला आहे. त्यांच्यासोबत काय होतं हे पाहावे लागेल असा दावाही अनिल देशमुख यांनी केला आहे. शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत १० जागा लढवल्या होत्या त्यातील ८ जागांवर विजय मिळवला आहे तर अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने ४ जागांवर निवडणूक लढवली त्यातील केवळ एका जागेवर विजय मिळवला आहे. मविआत काँग्रेसनं १४, शिवसेना ठाकरे गटानं ९ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ८ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आता विधानसभेत महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील आणि सर्वाधिक जागा कोण लढवेल हे पाहणे गरजेचे आहे. 
 

Web Title: Fewer seats contested in Lok Sabha but picture will be different in Assembly, Sharad Pawar Uddhav Thackeray hint to Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.