मुंबई : गर्भाशयात वाढलेला १२ किलो वजनाचा फायब्रॉइड (एक प्रकारची गाठ) काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया कामा रुग्णालयात पार पडली. एवढ्या वजनाचा फायब्रॉइडचा गोळा असल्याने कर्करोग असण्याचा धोका होता. पण हा गोळा नुसताच वाढला होता. कर्करोग नसल्याचे शस्त्रक्रियेनंतर स्पष्ट झाल्याची माहिती कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजश्री कटके यांनी दिली. याआधी कामा रुग्णालयात १० किलो आणि ७ किलो वजनाचा फायब्रॉइडचा गोळा काढण्यात आला होता. पण १२ किलो म्हणजे हा सर्वाधिक वजनाचा गोळा असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. वडाळा येथे राहणाऱ्या ३८ वर्षीय महिलेला आॅक्टोबर महिन्यापासून त्रास जाणवायला लागला होता. या महिलेच्या पोटाचा आकार वाढत होता. पण तिला दुखत नव्हते अथवा अन्य कोणताही त्रास जाणवत नव्हता. त्यामुळे या महिलेने प्राथमिक स्थितीत याकडे दुर्लक्ष केले. पण काही दिवसांतच तिच्या पोटाचा आकार अधिक वाढला आणि पोट जड वाटू लागले. त्यामुळे ही महिला जवळच्या डॉक्टरांकडे गेली. तेव्हा पोटाचा आकार का वाढला, याचे निदान झाले नाही. त्यानंतर ती रुग्णालयात गेली, पण तेथे उपचार झाले नाहीत. त्यानंतर ही महिला कामा रुग्णालयात आली. कामा रुग्णालयात या महिलेला आणण्यात आले तेव्हा तिच्या पोटाचा आकार खूप मोठा झाला होता. ४ ते ५ बाळ पोटात असल्यास जितका आकार दिसेल इतके पोट वाढले होते. रुग्णालयात आणल्यावर सीटीस्कॅन, एमआरआय करण्यात आले. त्या वेळी फायब्रॉइडचा गोळा असल्याचे निदान करण्यात आले. त्यानंतर तपासण्या करून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्या महिलेची प्रकृती स्थिर असून तिला कोणताही त्रास होत नाही, असे डॉ. कटके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गर्भाशयातून काढला १२ किलो वजनाचा फायब्रॉइड
By admin | Published: December 22, 2016 4:14 AM