मुंबई : लेखी आणि तोंडी परीक्षेत २५-२५ मार्क असतात तसे मैदानी परीक्षेतही ५० मार्क असतात त्यामुळे आमदारांची लोकशाही मार्गाने निवडून आलेली स्टेंथ म्हणजे मैदानी परीक्षा असते त्यामुळे निवडणूक आयोगाचा पेपर फुटलेला नाही तर हा पेपर स्वच्छ समोर आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी 'निवडणूक आयोगाचा पेपर फुटला' या वक्तव्याचा समाचार घेताना लगावला.
आज प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रमाला आले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुनिल तटकरे यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. निवडणूक आयोगाचा पेपर फुटला आहे तो पेपर फुटल्यामुळे प्रफुल पटेल आणि धनंजय मुंडे यांनी फुटलेल्या पेपरवर प्रतिक्रिया दिली आहे असे ऐकण्यात आले. हा पेपर फुटायचे कारणच नाही. निवडणूक आयोगाची जी काही परिक्षा आहे त्यात सरळ सांगायचे झाले तर लेखी परीक्षेत २५ तर तोंडी परीक्षेला २५ मार्क आहेत आणि मैदानी परीक्षेला ५० मार्क आहेत असे प्रत्येक परीक्षेचं एक विश्लेषण असते, असे सुनिल तटकरे म्हणाले.
सरकारी भरती होत असतात त्यावेळीही लेखी, तोंडी, आणि मैदानीला मार्क असतात. त्यामुळे त्यामध्ये कुठल्या विषयाला मार्क ठरलेले आहेत. त्या मार्काचा अभ्यास करत कदाचित प्रफुल पटेल आणि धनंजय मुंडे व माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्ता म्हणत असेल त्यामुळे आम्ही घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब ठरेल असे सांगतानाच निवडणूक आयोगाची स्वायत्तता, सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे दिलेला निकाल याची कायदेशीर, ज्येष्ठ विधीज्ञासोबत चर्चा करून सामुदायिकरित्या लोकशाही मार्गाने घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करेल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
याचबरोबर, दादांच्या (अजित पवार) नाराजीच्या कल्पोकल्पित कथा किंवा त्यासंदर्भातील भाष्य आमच्यावर प्रेम करणारे जे काही हितचिंतक आहेत, ते जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठलीही नाराजी अजित पवार यांच्या मनात किंवा मंत्र्यांच्या, आमदारांच्या मनात आजपर्यंत नाही. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. त्या विचारांशी समरस होऊनच काम करण्याची आमची सर्वांची तयारी आहे, असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले. दरम्यान, अजित पवारांच्या नाराजीच्या कल्पोकल्पित कथा काही आमच्या हितचिंतकांकडून केल्या जात आहेत, असे म्हणत सुनिल तटकरे यांनी नेमका कुणावर निशाणा साधला. याबाबत चर्चा सुरु आहे.