ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २ - पंढरपूरातील विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेऊन नाशिककडे परतत असताना शेलगांव वांगी (ता़ करमाळा) येथे ट्रक व छोटा हत्तीच्या भीषण अपघातात पाच वारकरी जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. दुपारी एकच्या सुमारास झालेल्या या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर करमाळा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देवदर्शनासाठी नाशिक येथील १५ वारकरी पंढरपूर येथे शुक्रवारी सायंकाळी आले होते़. शनिवारी सकाळी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन हे भाविक एमएच ०४ एसजे ६८३८ या छोटा हत्तीमधून नाशिककडे निघाले होते़. दुपारी एकच्या सुमारास छोटा हत्ती वांगी शेलगावनजीकच्या पुलावर आले असताना परराज्यातील मालवाहतूक ट्रकने छोटा हत्तीस जोराची धडक दिली़. या धडकेत पाठीमागील बाजूस बसलेले पाच वारकरी जागीच ठार झाले असून 9 वारकरी जखमी झाले. वारकऱ्यांमध्ये 10 महिला व 3 पुरूष असून मृतांमध्ये पाचही महिला वारकरी आहेत. जखमींना करमाळा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे या महार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती़.
घटनास्थळावर पोलीस दाखल झाले असून अन्य जखमी वारक-यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. दरम्यान या अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे.