नायलॉन मांजा घातकच : पालक आनंदी; व्यापारी नाराजनागपूर : घातक नायलॉन मांजावर पोलिसांनी बंदी घातली आहे. या बंदीमुळे एकीकडे पालकांनी आनंद व्यक्त केला असला तरी ऐन वेळेवर बंदी घातल्याने व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. मकरसंक्रांतीचा सण हा नागपूर शहरातही मोठ्या प्रमाणावर पतंग उडवून साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाची खरेदी-विक्री केली जाते. नायलॉन मांजा हा नायलॉन धाग्यापासून तयार करण्यात येत असून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून अत्यंत मजबूत बनवला जातो. त्यामुळे नायलॉन मांजा सहसा तुटत नाही व काही वर्षे तसाच राहतो. या मांजाच्या वापरामुळे गंभीर स्वरूपाच्या जखमा होतात. अनेकांचे गळे चिरले जातात, नाक, कान व गालावर गंभीर जखमा होतात. रस्त्याने जात असलेल्या दुचाकी वाहन नायलॉन मांजात अडकून गंभीर अपघाताला बळी पडतात. अशा प्रकारे नायलॉन मांजा नागरिकांच्या जीविताला व आरोग्याला धोका निर्माण करतो. तसेच नायलॉन मांजा झाडावर, विद्युत खांबावर, रस्त्यावर तसाच अडकून राहतो. त्यामुळे पर्यावरणासही धोका उत्पन्न होतो. या पार्श्वभूमीवर सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह यांनी ८ जानेवारी ते ३१ जानेवारीदरम्यान नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. तसेच यादरम्यान कुणी पतंग उडवितांना नायलॉन मांजाचा वापर केल्यास त्याच्यावर कलम १८८ भादंवि प्रमाणे कार्यवाही केली जाईल, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी लोकमतने शहरातील पतंग व मांजा विक्रेते-व्यापारी आणि सामान्य पालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नायलॉन मांजावरील निर्णयाचे पालकांनी स्वागत केले असले तरी व्यापाऱ्यांमध्ये मात्र नाराजी दिसून आली. स्वस्त व मजबुतीमुळे मागणी नागपूर शहरात इतवारी, महाल, जुनी शुक्रवारी हा भाग पतंग व मांजा विक्रीचे प्रमुख ठिकाण आहे. पतंगाचा व्यवसाय हा सिझनेबल असून कोट्यवधीची उलाढाल करणारा आहे. नायलॉन मांजा हा पारंपरिक मांजाच्या तुलनेत स्वस्त व अधिक मजबूत असल्यामुळे मागील काही वर्षांपासून नायलॉन मांजाची मागणी वाढली आहे. १०० रुपयांमध्ये नायलॉन मांजा चक्रीसह मिळतो तर पारंपरिक मांजाची विक्री २५० रुपयापासून सुरुवात होते. त्यामुळे स्वस्त व अधिक मजबूत असल्याने नायलॉन मांजाची विक्री प्रचंड वाढली आहे. त्यामुळे या मांजावरच व्यापाऱ्यांचा ९० टक्के व्यवसाय अवलंबून आहे. व्हेलेन व मोनोफीलला सर्वाधिक मागणी नायलॉन मांजामध्येसुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. दोन वर्षांपासून व्हेलेन व मोनोफील या नायलॉन मांजाची मागणी सर्वाधिक आहे. कारण हे मांजे अधिक मजबूत असून ते घातक आहेत. मजबुतीसह स्वस्त असल्याने पतंग उडविणाऱ्यांची ती पहिली पसंत बनले आहे. सर्वच नायलॉन मांजे घातक नाही नायलॉन मांजा म्हटला की तो घातकच असेल असे नाही. नागपुरात बंगळुरू येथून नायलॉन मांजा येतो. यामध्ये जसे घातक मांजा आहे, तसाच कच्चा मांजा सुद्धा आहे. मोनोकाईट यासारखे काही मांजे हे खास पतंग उडविण्यासाठीच तयार करण्यात आले आहे. ते सर्टिफाईड असून कंपनीने त्याची योग्य तपासणी करून ते बाजारात आणले आहे. त्यासंबंधीचे कागदोपत्री दस्ताऐवज सुद्धा कंपनीने विक्रेत्याना उपलब्ध करून दिले असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
जीवघेणा मांजा...
By admin | Published: January 09, 2015 12:51 AM