मुंबई : रेल्वे स्थानक आणि हद्दीत वावरणाऱ्या फेरीवाल्यांची ‘गुंडगिरी’ वाढल्याचे नुकत्याच घडलेल्या पाटलीपुत्र एक्स्प्रेसवरील दरोड्याच्या घटनेतून समोर आले. यातील सात आरोपींपैकी सहा जणांना अटक करण्यात आली असून, बहुतांश आरोपी हे रेल्वे स्थानक हद्दीतील फेरीवाले असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. १९ डिसेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून पाटलीपुत्र एक्स्प्रेस सुटली. ही ट्रेन कल्याण रेल्वे स्टेशन येथे आल्यानंतर इंजिनमागील जनरल डब्यात सात आरोपींनी प्रवेश केला. मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास ट्रेन कल्याण ते कसारादरम्यान येताच आठ ते दहा प्रवासी आणि त्यांच्यासोबत असलेल्या चार सहप्रवाशांना सात आरोपींकडून चाकूचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली. यात प्रवाशांजवळील मोबाइल व रोख रक्कम २८ हजार ५७0 रुपये असा ऐवज लुटण्यात आला. त्यानंतर खर्डी रेल्वे स्टेशनजवळ ट्रेनमधील चेन खेचून ट्रेन थांबवून सर्व आरोपी पळून गेले. इगतपुरी लोहमार्ग पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून तपासासाठी तत्काळ पाच पथके तयार करण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, पोलिसांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर प्रथम शहाबाज शेख आणि सद्दाम हुसेन शेख या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीनंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि कसारा व इगतपुरी येथे राहणारे अन्य साथीदार सचिन मसणे, सतीश बाळुदोंदे, राहुल, सागर व आकाश यांचाही या गुन्ह्यात समावेश असल्याचे सांगितले. आकाश हा आरोपी सोडता खडवली येथूनच सागर या आरोपीने घेतलेल्या एका भाड्याच्या घरातूनच सर्वांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दहा मोबाइल तसेच गुन्ह्यात वापरलेले दोन चाकू, एक फायटर पंच अशी हत्यारेही जप्त केली. (प्रतिनिधी)आरोपी रेल्वे हद्दीत काम करणारेअटक आरोपी हे रेल्वे हद्दीतच किरकोळ वस्तू विकण्याची कामे करत होते, अशी माहिती कौशिक यांनी दिली. सर्व आरोपी यांनी याच ट्रेनमधून आधी प्रवासही केला होता. तसेच ट्रेनमधील कोणत्या डब्यात पोलिसांचा पहारा असतो व ट्रेनला कुठे-कुठे थांबा मिळतो याची माहिती मिळवल्यानंतरच दरोडा टाकला.जनरल डब्यात एकही आरपीएफ तैनात नसतो. तर अन्य डब्यात पोलीस असतात हेदेखील आरोपींनी हेरले होते.पाटलीपुत्र एक्स्प्रेसला कल्याण ते कसारादरम्यान रेल्वेकडून काही तांत्रिक कारणास्तव थांबा दिला जातो आणि हे पाहूनच नेमका त्याच दरम्यान दरोडा टाकण्याचा निर्णय आरोपींकडून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
फेरीवाल्यांनीच घातला एक्स्प्रेसमध्ये दरोडा
By admin | Published: December 27, 2016 3:52 AM