मुंबई : ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गाचा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) डिसेंबर २0१७ ची अंतिम मुदत निश्चित केली आहे. प्रकल्प मार्गी लावण्यासाठी वेगाने कामे सुरू असतानाच जुन्या मार्गाला हा नवीन मार्ग जोडण्यासाठी अनेक कट-कनेक्शनची कामे करावी लागणार आहेत. या कामांचे अद्यापही नियोजन झाले नसल्याने प्रकल्पाच्या नियोजित वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग रखडण्याची चिन्हे आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यास ठाण्यापुढील लोकल सेवांवर येणारा ताण कमी होईल. या मार्गावरून लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक सुरू झाल्यानंतर लोकलचा प्रवास सुकर होईल आणि फेऱ्याही वाढवण्यास मदत होईल, असे एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) सांगण्यात आले आहे. सध्या या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येत आहे. ठाणे ते कळवादरम्यान पुलांची उभारणी, मुंब्रा ते कळवा दरम्यानची जागा सपाट करणे आणि रूळ टाकणे यासाठी जागा तयार करणे, मुंब्रा येथे नवा उड्डाणपूल बांधून त्याखालून नवी मार्गिका तयार करणे इत्यादी कामे केली जात आहेत. मात्र, या कामांना गती दिली जात असली, तरी धिमा मार्ग आणि नव्याने होणारा जलद मार्ग हा आठ ठिकाणी एकमेकांना जोडला जाणार आहे. या कामासाठी मध्य रेल्वे आणि एमआरव्हीसीला मोठे ब्लॉक घ्यावे लागतील. रविवारी ब्लॉक घेणे कठीण असल्याने, अन्य दिवशीही ब्लॉक घेऊन कामे करावी लागतील. मात्र, ठाण्यापुढे ही कामे करणे कठीण आहे. लोकल थांबवून कामे पूर्ण करावी लागतील, असे एमआरव्हीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्याचे नियोजन केल्याशिवाय प्रकल्प पूर्ण होणार नाहीत, अन्यथा प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यास आणखी काही अवधी लागेल, असेही सांगण्यात आले. (प्रतिनिधी)अशा असतील मार्गिकानव्या मार्गिका ठाण्याहून कल्याणकडे जाणाऱ्या धिम्या मार्गाच्या बाजूला आहेत. कळवा स्थानकाजवळ या मार्गिका मुंबईकडे येताना धिम्या मार्गाच्याबाजूने जातात. कळवा ते पारसिक डोंगर या दरम्यान या दोन्ही मार्गिका याच मार्गाच्या बाजूने जातात. मुंब्रा स्थानकाजवळ पुन्हा कल्याणकडे जाणाऱ्या धिम्या मार्गिकेच्या बाजूने थेट दिवा स्थानकापर्यंत या मार्गिका नेण्यात येईल.
पाचवा-सहावा मार्ग रखडणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2016 5:40 AM