ओंकार करंबेळकर/ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.19 - जबतक हात चल रहा है तबतक मै काम करुंगा, खाली क्यूं बैठनेका... इसिलिये मै दिनभर पेन दुरुस्त करता हू.. हे आहेत वयाची सत्तरी उलटलेले आमिर पंजवानी. गेली पन्नास वर्षे ते पेन दुरुस्त करायचं काम करतात. काही वर्षांपुर्वीपर्यंत पेनाशिवाय कोणतंही काम होणं अशक्य असायचं. एक रुपयापासून लाखो रुपयांपर्यंत किमतीचे पेन बाजारात उपलब्ध होते आणि आजही आहेत. या महागामोलाच्या पेनांची मोडतोड झाली किंवा काहीही झालं तर मुंबईतल्या दुकानदारांसाठी तेव्हा एकमेव पर्याय उपलब्ध होता तो म्हणजे पंजवानी यांचा.
आमिर पंजवानी यांनी 50 वर्षांपुर्वी मुंबईच्या ओ.के. पेन मार्टमध्ये काम सुरु केलं. खरंतर त्यांना या कामाची काहीच माहिती नव्हती. पण तेव्हा इमामवाड्यात राहत असताना काहीतरी काम कर म्हणून एका शेजाऱ्याने त्यांना या दुकानात 60 रुपये महिना पगारावार नोकरी लावून दिली. झालं... तेव्हापासून आमिर यांनी पेनामध्ये घातलेलं डोकं आजही वर केलेलं नाही. सुरुवातीची काही वर्षे त्यांनी फक्त पेनांचे निरीक्षण केलं. पेन कसं चालतं, पेनात घातलेली शाई कशी उतरते, बटण दाबल्यावर काय होतं याच फक्त निरीक्षण केलं. नंतर त्यांनी पेनाच्या एकेक भागाची ओळख करुन घेतली. शाईचे पेन, बॉलपेन ते बघताबघता दुरुस्त करुन देऊ लागले. आमिर नामका कोई लडका ये काम अच्छा करता है असं त्यांचं नाव सगळ्या फोर्ट परिसरामध्ये झालं. आमिरभाईकडे पेन गेलं म्हणजे ते व्यवस्थित दुरुस्त होऊन धड अवस्थेत परत येणार याची खात्री लोकांना होती. साहजिकच या क्षेत्रात आमिर चांगलेच प्रसिद्ध झाले. 17 वर्षे नोकरी केल्यावर त्यांनी स्वतःच हे दुरुस्तीचं काम करायला सुरुवात केली. रोज फोर्ट परीसरामध्ये जायचं आणि दुकानांमध्ये मोडलेले पेन गोळा करायचे आणि दुसऱ्या दिवशी दुरुस्त केलेले पेन परत द्यायचे असं त्यांचं काम सुरु झालं.
आमिर पंजवानींकडे येणारे पेन हे बहुतांश महागडे असायचे. पंधरा हजारांपासून, लाख रुपयांपर्यंत किंमत असलेले पेन त्यांच्याकडे दुरुस्तीला येऊ लागले. त्यांचं या पेनाच्या दुरुस्तीमुळे पेनाचे डॉक्टर म्हणून नावच पडलं. फोर्टमधले दुकानदार ग्राहकाकडून आलेलं पेन फक्त आमिरभाईनाच देत असत, यामागचं कारण काय विचारल्यावर आमिर सांगतात, " ये सब धंदा भरोसेपर चलता है, ट्रस्ट होना मंगता है " परदेशातून आलेले हे पेन चांदीचे, काहीवेळेस सोन्याचेही प्लेटिंग असलेले असतात. काही पेनना प्लॅटिनमची निब असते. इतके महागाचे पेन दुरुस्तीसाठी मिळवायचे सोपं काम नाही, मला ते मिळत गेले कारण माझ्यावर त्या दुकानदारांनी विश्वास ठेवला होता. आजही त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. त्या उमेदीच्या काळात भरपूर काम केलं. दिवसरात्र फक्त पेन आणि त्यांची दुरुस्ती इतकंच माझ्या डोळ्यासमोर होतं. इमामवाड्यातून मुंब्र्याला राहायला आल्यावर सुरुवातील घरात वीजही नव्हती. मग रात्री मी मेणबत्तीच्या उजेडात पेन दुरुस्त करायला बसायचो. सकाळी सात वाजता काम सुरु केलं की रात्री एक वाजेपर्यंत हे काम चालायचं.
आमिर सुरुवातीला दररोज फोर्टला जायचे, मग एक दिवसआड जायला सुरुवात केली. काही वर्षांनी जसं वय वाढत गेलं तसं त्यांनी फोर्टला जाणं कमी केलं. आठवड्यातून दोनदा, एकदा असं करत त्यांनी फोर्टला जाणं पूर्णच थांबवलं. पण फोर्टच्या फेऱ्या थांबल्या असल्या तरी दुकानदारांनी त्यांची पाठ सोडलेली नाही. दुकानदार त्यांना आपल्या माणसांकरवी पेन पाठवून देतात आणि दुरुस्त करुन घेतात. केवळ या पेनांच्या दुरुस्तीवर आमिर यांनी आपलं कुटुंब चालवलं, घर सांभाळलं आणि एकुलत्या एका मुलाचं शिक्षणही केलं. आता त्यांचा मुलगा कामासाठी कॅनडामध्ये स्थायिक झाला आहे. तो म्हणतो, कशाला आता काम करता, आता पैशाची काही गरज नाही. पण हे पेनाचे डॉक्टर कोणाचं ऐकत नाहीत. आजही सकाळी साडेअकरापासून 1 वाजेपर्यंत ते काम करतात, जेवल्यावर थोडी विश्रांती घेतल्यावर पुन्हा दोन-तीन तास काम करतात. जोपर्यंत हात चालतो तोपर्यंत मी हे काम करत राहणार असं ते हसून सांगतात. हे काम केलं की माझा वेळ उत्तमप्रकारे जातो आणि वयोमानाप्रमाणे आलेले आजारही विसरायला होतात. 73 व्या वर्षीही आज त्यांच्याकडं भरपूर काम आहे. टेबलचे ड्रॉवर आणि दोन कपाटे भरून त्यांच्याकडे पेनांचे सुटे भाग भरलेले आहेत. त्यांच्यावर लोकांनी ठेवेलेल्या विश्वासाचं आणि आजवरच्या वाटचालीचं रहस्य सांगताना ते म्हणतात, जिंदगीभर मैने कभी बुरा काम नही किया, किसीका बुरा सोचा नही, उसका फल मुझे मिल रहा है...