लोकमत न्यूज नेटवर्क, वडीगोद्री (जि. जालना) : विधानभवनात आवाज उठवायला हवा. त्यामुळे आमच्या हक्काचे पाच पन्नास लोक शंभर टक्के आम्ही पाठवणार. तरीही समाजाचा विचार घेऊन २९ ऑगस्टला यासंबंधी सर्व काही ठरवणार, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
विधान परिषदेला ज्या आमदारक्या मिळतात, त्या मराठा समाजात फूट पाडण्यासाठीच मिळत आहेत. त्यांना शांततेने सुरू असलेल्या आंदोलनात काहीतरी घडवून आणायचे आहे. ७ ऑगस्टच्या रॅलीत काही अनुचित प्रकार घडवून आणण्याची शक्यता असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.
मंगळवारी मराठा ठोक मोर्चाच्या काही आंदोलकांनी उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यासंदर्भात जरांगे म्हणाले की, सर्वच पक्षांना जाब विचारला पाहिजे. वैयक्तिक कोणाच्या दारात तुम्ही आंदोलन करू शकता. पण मराठ्यांचे सध्या कुठेही आंदोलन सुरू नसताना तुम्ही आंदोलन करता, म्हणजे हा काहीतरी डाव आहे.
प्रकृती खालावली
जरांगे यांची तब्येत खालावल्याने अंतरवाली सराटीतच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी त्यांना अशक्तपणा जाणवू लागला. तसेच रक्तदाब कमी झाल्याने त्यांना घरीच सलाइन लावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.