पुणे: राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील प्रमुख शहरांमधील ३ लाख ९५ हजार ६४३ विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. मागील वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत यंदा नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यावर्षी अकरावी प्रवेशसाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
राज्यातील मुंबई पुणे पिंपरी-चिंचवड, नाशिक ,औरंगाबाद ,अमरावती ,नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने केले जात आहेत. त्यासाठी २४ जुलैपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ३ लाख ९५ हजार ६४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात मुंबईतील २ लाख २८ हजार २४८ ,पुण्यातील ८४ हजार १३३ , नागपुर मधील ३१ हजार ६०७ नाशिक मधील २५ हजार ९०३ औरंगाबादमधील १५ हजार ४११ अमरावती मधील १० हजार ३४१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मागील वर्षी राज्यातील १ हजार ६०५ कनिष्ठ महाविद्यालयांमधील ५ लाख ६० हजार ९८२ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातील ३ लाख ६६ हजार ४९५ जागांवर राज्यातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तर राज्यातील १ लाख ९४ हजार ३३५ जागा रिक्त राहिल्या होत्या.यंदा दहावीचा निकाल वाढला असून प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असणार आहे.
----------------
महापालिका क्षेत्रनिहाय नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी (५ ऑगस्ट,सायंकाळी ६ पर्यंत)
पुणे , पिंपरी-चिंचवड- ८४,१३३, मुंबई - २,२८,२४८,नागपूर- ३१,६०७, नाशिक - २५,९०३, औरंगाबाद - १४,४११, अमरावती- १०,३४१,
--------------
गेल्या वर्षीची अकरावी प्रवेशाची आकडेवारी
शहर एकूण जागा झालेले प्रवेश रिक्त जागा
पुणे १,०५,९१४ ६९,०५६ ३६,८५८
मुंबई ३,२६,७९६ २,१८,७३० १,०८,०६६
अमरावती १४,९४२ १०,४९१ ४,४५१
औरंगाबाद २९,४९० १६,५४९ १२,८३१
नागपूर ५८,८२० ३२,४२५ २६,३९५
नाशिक २५,००० १९,२४४ ५,७५६
----------------------------