पारनेर (जि.अहमदनगर) : भ्रष्टाचार विरोधी लढाईला आपण प्राथमिकता देण्याचे जाहीर केले, पण त्यास अजून प्राथमिकता मिळालेली नाही. सरकारकडे पूर्ण बहुमत असल्याने भ्रष्टाचार विरोधी प्रलंबित विधेयक तत्काळ आणावे, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अण्णांनी त्यांना पहिल्यांदाच पत्र लिहिले आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई करण्यासाठी मोदींनी केलेल्या भाषणाचे त्यांनी स्वागत केले आहे. पण या लढाईला प्राधान्य मिळत नसल्याचा टोला लगावत, आता वर्षभर त्यासाठी थांबणे आवश्यक नाही. बहुमत असल्याने भ्रष्टाचार थांबविण्यासाठी लोकपालची अंमलबजावणी झालीच पाहिजे, असेही अण्णांनी पत्रात म्हणले आहे. नागरिकांची सनद, न्यायव्यवस्थेतील दर्जा व विश्वासार्हता विधेयक २०१२, मनी लॉड्रींग विधेयक, पब्लिक प्रोक्युअरमेंट विधेयक, ग्रामसभेला कायद्याने जास्त अधिकार, राईट टु रिकॉल, राईट टु रिजेक्ट ही विधेयके आणल्यास भ्रष्टाचार विरोधी लढाईत मोठी कामगिरी होईल, असे पत्रात नमुद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
भ्रष्टाचारविरोधी लढाईला प्राथमिकता मिळाली नाही
By admin | Published: August 29, 2014 3:28 AM