मुंबई : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) द्वैवार्षिक निवडणूकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एमसीए उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली असून, यानुसार अध्यक्षपपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व क्रिकेट फर्स्ट गटाचे प्रमुख डॉ. विजय पाटील यांच्यामध्ये थेट लढत होईल हे स्पष्ट झाले आहे.शनिवारी एमसीए निवडणूकीसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेण्याचा अखेरच्या दिवस होता. यावेळी पवार - म्हाडदळकर गटाच्या रवी सावंत आणि आमदार आशिष शेलार यांनी अध्यक्षपदासाठी दाखल केलेला आपआपला अर्ज मागे घेऊन विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे आता पवार यांच्यासमोर अपेक्षेप्रमाणे डॉ. विजय पाटील यांचे आव्हान असेल हे स्पष्ट झाले. एकूण १७ पदांसाठी होणाऱ्या या निवडणूकीमध्ये अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, दोन सह-सचिव पद, खजिनदार व ११ कार्यकारीणी सदस्यपदांसाठी निवडणूक रंगणार आहे. उपाध्यक्षपदासाठी पवार - म्हाडदळकर गटाकडून माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर आणि आमदार आशिष शेलार यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांच्यासमोर आव्हान असेल ते क्रिकेट फर्स्टच्या माजी क्रिकेटपटू अॅबी कुरविल्ला आणि आमदार प्रताप सरनाईक यांचे. दरम्यान क्रिकेट फर्स्ट गटाला शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला असल्याने यंदाच्या निवडणूकीत क्रिकेट फर्स्ट गटाच्या उमेदवारांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सह-सचिव पदाच्या दोन जागांसाठी देखील मोठी चुरस रंगणार असून क्रिकेट फर्स्ट गटातून डॉ. उन्मेश खानविलकर आणि माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांनी पवार - म्हाडदळकर गटाच्या रवी सावंत व डॉ. पी. व्ही. शेट्टी यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. तर खजिनदारपदासाठी नितीन दलाल (पवार - म्हाडदळकर) आणि मयांक खांडवाला (क्रिकेट फर्स्ट) यांच्यामध्ये मोठी चुरस असेल. विशेष म्हणजे एमसीए निवडणूकीच्या मैदानात पहिल्यांदाच उतरलेल्या रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी उपाध्यक्षपदासाठी भरलेला आपला अर्ज मागे घेतला असल्याने निवडणूकीच्या दिवशी त्यांचा पाठिंबा कोणाला असेल याबाबत आता उत्सुकता लागली आहे. (क्रीडा प्रतिनिधी)निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादीपवार - म्हडदाळकर : शरद पवार (अध्यक्षपद), दिलीप वेंगसरकर व आशिष शेलार (उपाध्यक्षपद), रवी सावंत व डॉ. पी. व्ही. शेट्टी (सह - सचिव पद), नितीन दलाल (खजिनदारपद), कार्यकारणी पदाचे उमेदवार : विनोद देशपांडे, दिपक मूरकर, पंकज ठाकूर, रमेश वाजगे, दीपक पाटील, अरविंद कदम, अरमान मलिक, श्रीकांत तिगडी, नवीन शेट्टी, गणेश अय्यर, शाह अलम.क्रिकेट फर्स्ट : डॉ. विजय पाटील (अध्यक्षपद), अॅबी कुरविल्ला व प्रताप सरनाईक (उपाध्यक्षपदासाठी), डॉ. उन्मेश खानविलकर व लालचंद राजपूत (सहसचिव पद), मयांक खांडवाला (खजिनदारपद), कार्यकारणी सदस्यपदासाठी : प्रवीण आमरे, जगदीश गावंडे, दीपक जाधव, संगम लाड, नदीम मेमन, दाऊद पटेल, संजय पाटील, राजेंद्र फातरपेकर, सुरज समत, इक्बाल शेख, राहूल शेवाळे.
पवार विरुद्ध पाटील लढत
By admin | Published: June 14, 2015 1:50 AM