ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २८ - 'दोघांचे भांडण तिस-याचा लाभ' ही म्हण आपण ब-याच वेळेस ऐकली आहे,पण पुण्यात मात्र दोघांच्या भांडणामुळे तिस-याच व्यक्तीचा हकनाक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुत्रा अंगावर धावून गेल्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या वादात सागर चौघुले या तिस-याच व्यक्तीचा बळी गेल्याची घटना काल (बुधवार) रात्री हडपसर येथील दौरीनगरमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दौरीनगर भागात राहणा-या निलेश शिंदे यांच्या अंगावर काल संध्याकाळी गणेश वाबळे याचा गावठी कुत्रा धावून गेला. तो कुत्रा नेहमी अंगावर येतो अशी तक्रार बावळे यांच्याकडे केली असता त्या दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी निलेशचा मित्र असणा-या समीर चौघुलेने वाद सोडवण्यासाठी पुढाकार घेतला व ते भांडण तिथेच मिटले. मात्र याचा राग मनात धरून थोड्या वेळाने वाबळे काही तरूणांसह परतला व त्याने शिंदे व मित्रांना मारहाण केली. त्यामध्ये समीर चौघुले हा गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. या भांडणात सनी चौगुले, संदीप शिंदे, शकुंतला सावंत हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून आणखी तिघे जण फरार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.