पुणे : असहिष्णुतेला याआधीही सामोरे जावे लागले आहे. त्याविरोधात आवाजही उठवण्यात आला. सध्याच्या परिस्थितीतही अशाच लढ्याची गरज आहे. असहिष्णुतेविरोधात सर्वांनी एकत्रित लढा द्यायला हवा. त्यासाठी स्वत:पासून सुरुवात करायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयोजित पाचव्या सम्यक साहित्य साहित्य संमेलनाचे उद्घाटन महेश भट यांच्या हस्ते बोधी वृक्षाला पाणी घालून करण्यात आले. भट म्हणाले, सूर्यप्रकाश कोणीही रोखू शकत नाही. तो सर्वत्र सारखाच पसरतो. भेदभाव हा माणसाकडून केला जातो. या भेदभावाविरोधात लढण्याची क्षमता आपण विकसित करायला हवी. सध्या चित्रपटाविरोधात आंदोलने सुरू आहेत. समाजातील मूल्ये भरडली जात आहेत. मात्र, प्रत्येकाला राज्यघटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीची बाजू ऐकून घेण्याची सहिष्णुता प्रत्येकाने दाखवायला हवी.सध्याची परिस्थिती भारतातील उद्याच्या हुकूमशाहीची नांदी आहे. देशात बनावट संघर्ष उभे करुन त्यात जनतेला गुंतवून राज्य करण्याची ही अजब तऱ्हा आहे. याविरोधात एकत्रित लढा उभारण्याची गरज आहे. त्यासाठी धर्मनिरपेक्षतेचा मतितार्थ समजून घ्यायला हवा. धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्वधर्मसमभाव नव्हे, तर जगण्याच्या संघर्षात व्यावहारिक, ऐहिक प्रश्नांचा संबंध न जोडण्याची मान्यता म्हणजे धर्मनिरपेक्षता. धर्मचिकित्सा हा सध्याचा कळीचा मुद्दा आहे. चिकित्सा केल्याशिवाय धर्म कळत नाही, असे संमेलनाध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शहरात १२५ बोधीवृक्ष लावणार असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी सांगितले. चौथ्या संमेलनाच्या अध्यक्षा कवयित्री नीरजा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, बार्टीचे व्ही.जी. रामटेके, उर्दू साहित्यिक प्रा. जहीर अली उपस्थित होते. (प्रतिनिधी)संविधान दिंडी : सम्यक साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पुतळ््यापासून भिडेवाड्यातील शाळेपर्यंत संविधान दिंडी आयोजित करण्यात आली होती. सम्यक साहित्य संमेलनाच्या दालनांना नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि यशवंत सुमंत यांची नावे देण्यात आली आहेत.
असहिष्णुतेविरोधात एकत्रित लढा द्या
By admin | Published: December 19, 2015 1:56 AM