भाईंदर : दिवाळीत धंद्याच्या काळात ठाणे आणि कल्याणमधील फेरीवाल्यांना मारहाण करून पिटाळून शौर्य दाखवण्यापेक्षा मनसैनिकांनी सीमेवर जाऊन शत्रूशी लढून दाखवावे, असा खोचक सल्ला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी मीरा रोड येथे पत्रकार परिषदेत दिला. मुंबईत मराठी माणसाचा टक्का कमी होतोय याचा राग त्या गरीब परप्रांतीय फेरीवाल्यांवर का काढता, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.फेरीवाल्यांना हटवणे भारतीय संविधानाविरोधात आहे. पुन्हा असे घडले तर आम्ही त्याचे उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी दिला. फेरीवाले आपले पोट इमानदारीने भरतात, ते चोरीचपाटी करीत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. पुढील महिन्यात गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार असून त्यात आमचा रिपब्लिकन पक्ष उमेदवार उभा न करता भाजपालाच पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तेथे भाजपाला अथवा लोकशाही पुरोगामी आघाडीला बहुमत मिळाल्यास रिपब्लिकन पक्षालाही सत्तेत सामावून घेण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.वाढत्या महागाईमुळे गरिबांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. पण केंद्र सरकारच्या तिजोरीत पैसाच नाही. पैसे येताच ते गरिबांसाठी खर्च केले जातील, असे सांगत त्यांनी केंद्राची आर्थिक चणचण उघड केली. शिवसेनेने भाजपाशी सतत भांडू नये, एकमेकांशी जुळवून घ्यावे. तसे न झाल्यास सर्वात जास्त नुकसान शिवसेनेचे होणार असल्याचे भाकीत आठवले यांनी केले. राज्यातील फडणवीस सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचा दावाही त्यांनी केला. केंद्र सरकारने अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा केली असून त्यात दलित-पीडितांच्या आर्थिक मदतीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यावर लवकरच दोन्ही सभागृहांची मान्यता घेतली जाणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.>उद्धव यांना क्लीन चिट : राज ठाकरे यांच्याकडे देण्याजोगे काहीच नसल्याने मुंबई महापालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत सामील झाले, असा दावा आठवले यांनी केला. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कोणताही घोडेबाजार केला नसल्याची क्लीन चिट त्यांनी दिली.
फेरीवाल्यांना मारण्यापेक्षा सीमेवर लढावे, फेरीवाल्यांना हटवणे भारतीय संविधानाविरोधात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 6:06 AM