जुन्नर (जि. पुणे) : सर्वांच्या मनात शिवरायांचे महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण होत राहते. रयतेचे राज्य स्थापन करण्यासाठी व त्याकरता लढण्यासाठी तलवार हाती घेण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढताना आम्हाला त्यांच्यापासून प्रेरणा व जिद्द मिळते, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.शिवनेरीवर पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार संभाजीराजे, खासदार अमोल कोल्हे, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, आमदार अतुल बेनके आदी उपस्थित होते. शिवजन्मस्थळापासून शिवकुंज स्मारकपर्यंत शिवबाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. शिवकुंज स्मारकातील बालशिवबाच्या शिल्पास उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मान्यवरांनी अभिवादन केले. किल्ले शिवनेरी परिसर विकास मंडळाच्या वतीने देण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार प्रशासकीय आधिकारी संकेत भोंडवे यांना, तर तालुकास्तरीय ‘शिवनेरी भूषण’ पुरस्कार सर्पदंश उपचारतज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांना देण्यात आला.
मलाही इंगितविद्या शिकायचीय...छत्रपती शिवाजी महाराजांना सहा ते सात प्रकारच्या भाषा येत होत्या. यामध्ये इंगितविद्या अशीही एक भाषा होती. या भाषेमुळे समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय हे ओळखता येत होते. तसेच नजरेच्या इशाऱ्यावर माणसांना काही सूचना देता येत असत, अशी विद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साध्य आहे, अशी टिप्पणी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी केली. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मला देखील ही इंगितविद्या शिकायचीच आहे; म्हणजे अजितदादांच्या मनात काय चाललंय हे ओळखता येईल!’ मुख्यमंत्र्यांच्या या वाक्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.