नागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख नागपूरमध्ये खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. पण उपचार केवळ नावालाच. त्यांच्या दैनंदिनीत काहीही बदल झालेला नाही. डॉक्टर व परिचरांच्या गराड्यातही पोलिसदलाचे प्रमुख व सोबतच काटोलचे आमदार, गोंदियाचे पालकमंत्री अशा सगळ्या जबाबदाऱ्या ते रुग्णशय्येवरून पार पाडताहेत.महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर गृहमंत्रिपद वैदर्भीय अनिल देशमुख यांना मिळेल, अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. पण, आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी पक्षातल्या दिग्गजांना बाजूला ठेवून ती जबाबदारी देशमुख यांच्यावर टाकली. ती अवघड जबाबदारी पार पाडताना वर्षभराहून अधिक काळ देशमुख यांची पायाला भिंगरी लावून प्रचंड धावपळ, अहोरात्र परिश्रम आणि सरकारवर रोज होणाऱ्या राजकीय हल्ल्यांचा आघाडीवर राहून केलेला सामना, ते कोरोनाबाधित झाल्यामुळे पुन्हा लोकांमध्ये चर्चेचा व तितकाच कौतुकाचा विषय बनला आहे.गृहखात्याची परीक्षा पाहणारे वर्षमावळते वर्ष महाविकास आघाडी, गृहखात्याची कसोटी पाहणारे ठरले. कोरोनाशिवाय अनेक प्रकरणांनी आव्हान उभे केले व ते गृहमंत्री देशमुख यांनी लीलया पेलले. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथील जमावाकडून दोन साधूंच्या हत्येचे प्रकरण हिंदुत्ववादी संघटनांनी देशभर पेटवले. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सरकार तसेच मुंबई पोलिसांना चाेहोबाजूंनी घेरण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. पत्रकार अर्णब गोस्वामी, अभिनेत्री कंगना रानौत आदींनी मुख्यमंत्री, गृहमंत्री व इतरांवर अनर्गल टीका केली. तत्पूर्वी, दिल्लीतील तबलिगी मरकझ, दादरच्या राजगृहावरील तोडफोड या प्रकरणांवेळीही देशमुखांनीच सरकारच्या बाजूने आघाडी सांभाळली. पतंजलीच्या कोरोनारोधक औषधावर बंदीपासून ते परवाच्या शेतकरी आंदोलनविरोधात ट्विटसाठी सेलिब्रिटींवर दबावाच्या मुद्यांवर तेच आक्रमक होते. याशिवाय त्यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्याला नवा शक्ती कायदा दिला.या पार्श्वभूमीवर, कोरोनाबाधित म्हणून उपचार घेत असतानाही गृहमंत्री देशमुख रणांगणावरच आहेत. भेटीगाठी बंद असल्या तरी आहार व उपचाराच्या काळजीसोबतच ऑनलाईन बैठका घेत आहेत. ट्विटरवरून पोलिसांचे कौतुक करताहेत. साहजिकच त्यांचे कुटुंबीय, विशेषत: पत्नी आरती, सलील व ऋषिकेष ही मुले, मुलगी डॉ. पायल, जावई डॉ. गौरव हे काळजीपोटी त्यांच्यासोबत आहेत. गृहमंत्र्यांच्या या लढाऊ बाण्याचे कार्यकर्ते व सामान्य नागरिकांना मात्र प्रचंड कौतुक आहे.
लिडिंग फ्रॉम द फ्रंट-लॉकडाऊन लागू झाल्यापासून आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत प्रत्यक्ष रणांगणावर लढले ते प्रामुख्याने पोलीस दल. मालेगाव, धारावी, वरळी कोळीवाडा अशा सुरवातीच्याही कोरोना हॉटस्पॉटवेळी गृहमंत्री देशमुख व आरोग्यमंत्री राजेश टोपे ही जोडी थेट मैदानात होती.-पोलिसांचे मनोबल कायम उंच ठेवण्यासाठी दौऱ्यांमध्ये जागोजागी शिपाई, हवालदार, होमगार्ड आदींच्या भेटी घेतल्या, पाठीवर थाप मारली.- गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांच्या गृहमंत्री आरती यांनी शेकडो पोलिसांच्या घरी फोन करून थेट विचारपूस केली, उमेद वाढवली.- गृहमंत्र्यांनी दिवाळी नक्षलग्रस्त गडचिरोलीत साजरी केली तर ३१ डिसेंबरला नव्या वर्षाचे स्वागत पुणे पोलिसांसोबत केले.- दोन जिल्ह्यांच्या सीमेवर दरवेळी गृहमंत्री हमखास थांबले, शिपाई ते अधिकाऱ्याचा वाढदिवस थेट चौकीत साजरा केला. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करतानाच वर्दीतल्या योद्ध्यांची काळजी घेणे, हे मोठे आव्हान गृहखात्यापुढे होते.- मुंबईमध्ये ९६ तर संपूर्ण महाराष्ट्रात ३२६ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना ६५ लाखांपर्यंत मदत करण्यात आली.- कोविड-१९ महामारीत मृत्यू पावलेल्या पोलिसांची कुटुंबे घर नसल्याने रस्त्यावर येऊ नयेत यासाठी त्यांची निवासस्थाने कायम ठेवण्यात आली.