मुंबई : ‘आरे जंगल वाचवा’ आंदोलनात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी लहान मुलांचा वापर केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने आयुक्त विवेक फणसळकर यांना नोटीस पाठवत ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. ११ जुलै रोजी जारी केलेल्या या नोटीसला अनुसरून ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल करणे, त्या अनुषंगाने केलेल्या कारवाईचा अहवाल आणि मुलांचे जबाब अशी सर्व माहिती नोटीस प्राप्त झाल्यापासून तीन दिवसात देण्याचे निर्देशही आयोगाने पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
या संदर्भात सह्याद्री राईट्स फोरम या संस्थेच्या विधी विभागाचे प्रमुख धृतीमन जोशी यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीसोबत आदित्य ठाकरे यांनी या आंदोलनाची त्यांच्या ट्विटर खात्यावर पोस्ट केलेल्या फोटोची लिंक देखील सादर केली आहे.
या ट्विटमध्ये पोस्ट केलेल्या फोटोमध्ये लहान मुले आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसत असून, याप्रकरणी बाल हक्कांचे उल्लंघन झाल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. या तक्रारीची आयोगाने दखल घेत तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांना या संदर्भात नोटीस जारी केली आहे.