छत्रपती संभाजीनगर - अमोल मिटकरींनी तोंडाला संयम ठेवावा असं अजित पवारांनी मागे सांगितले होते. त्यांनी संयम सोडला त्यामुळे आमच्या तरूण कार्यकर्त्याचा नाहक बळी गेला. साधी गाडी फोडली तर उमेश पाटील म्हणतात, राज ठाकरेंना अटक करा, खटला भरा, मग एखादा मृत्यू झाला तर यांच्या नेत्यांना जबाबदार धरलं पाहिजे. त्यामुळे अजित पवारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ही मागणी करतोय असं सांगत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी संतप्त भूमिका मांडली आहे.
प्रकाश महाजन म्हणाले की, २ दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी पुण्याच्या पूरपरिस्थितीवर विधान केले. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी माझे नेते राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हटलं. एका वैधानिक पदावर अमोल मिटकरी आहेत त्यांच्याकडे असा कुठला पुरावा आहे की राज ठाकरेंनी सुपारी घेतली. बेछूट आरोप करणं ही मिटकरींची सवय आहे. अनेकदा भाजपा नेत्यांवरही ते बोलतात. राष्ट्रवादी एकत्र असताना त्यांनी ब्राह्मण समाजावर अत्यंत घाणेरडे अनोद्गार काढलेले आहेत. त्या रागातून त्यांना जाब विचारण्यासाठी मनसे कार्यकर्ते गेले तिथे बाचाबाची झाली त्याचं रुपांतर गाडी फोडली. पण या सगळ्या गोष्टीचा तणाव येऊन आमचा तरुण कार्यकर्ता गेला. अमोल मिटकरी, उमेश पाटील आणि अजित पवार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली.
तसेच टीका करताना शाब्दिक शब्द काय वापरतो हेदेखील महत्त्वाचं आहे. राज ठाकरेंसारख्या नेत्याला सुपारीबाज म्हणता, तुमच्याकडे असा कुठला पुरावा आहे. मिटकरींनी आजपर्यंत तो पुरावा दिला का? सुपारीबाज तर अजित पवार आहेत, जरांडेश्वर कारखाना त्यांनी कशारितीने हडपला. खुद्द पंतप्रधानांनी ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं. आम्ही कधी अजित पवारांवर मर्यादा सोडून आरोप केलेत का? या राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंसाठी मनसे कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केले. कोकणातील आमचे वैभव खेडेकर यांचा विरोध होता. त्यावेळी तुम्ही राज ठाकरेंना मनवलं, मनापासून तुमचा प्रचार मनसे कार्यकर्त्यांनी केला. जर हा प्रचार केला नसता तर रायगडचं चित्र वेगळं दिसलं असतं. त्यावेळी तुम्हाला राज ठाकरे सुपारीबाज दिसले नाहीत, कारण तुमचा फायदा होता. बारामतीत आमच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांचा प्रचार केला. तेव्हा तुम्हाला आठवलं नाही का असा सवालही प्रकाश महाजन यांनी राष्ट्रवादीला विचारला.
दरम्यान, ज्या भाजपासोबत अजित पवार आहेत त्यांनी गाडीभर पुरावे त्यांच्याविरोधात नेले होते. अजित पवारांवर आम्ही आरोप केले नव्हते. आम्ही मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून महायुतीला पाठिंबा दिला होता. अजित पवारांना महायुतीत राहायचं नाही त्यामुळे काही ना काही करून भांडणं करतायेत. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांचे राज ठाकरेंशी चांगले संबंध आहेत हे त्यांना कुठेतरी खटकतंय. राज ठाकरे महायुतीत भिडू म्हणून आले तर आपलं कसं, त्यामुळे महायुतीतून बाहेर पडण्यासाठी अमोल मिटकरींच्या सडक्या डोक्यातून निघालेली ही कल्पना आहे असा आरोपही मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला.