Maharashtra Government: रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे प्रवास करताना नागरिकांचा जीव अक्षरश: मेटाकुटीला येतो. वारंवार आवाज उठवूनही खड्ड्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून खड्ड्यांबाबतच्या तक्रारीसाठी एक नवी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. खड्डे जलद दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ही खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता खड्ड्यांबाबतची तक्रार ऑनलाईन करता येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचे संगणकीकरण करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यासोबतच खड्ड्यासाठी तक्रार प्रणाली विकसीत केली आहे.
नागरिक या प्रणालीच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. प्रथम PCRS अँप गुगल प्ले स्टोअर, केंद्र शासनाच्या m- Seva portal, किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे संकेतस्थळ www.mahapwd.gov.in या संकेतस्थळावरून मोबाईलवर डाउनलोड करावे. नागरिकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या OTP चा वापर करावा आणि ॲप नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी रजिस्टर फीडबॅक येथे क्लिक करावे. मोबाईल स्क्रीनवर नकाशा दिसेल. त्यामध्ये आपले लोकेशन निश्चित करून खड्ड्यांचा फोटो अपलोड करण्यासाठी ‘Take Pothol Photo’ या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर खड्ड्यांचा फोटो घेऊन सदर तक्रारीबाबत अभिप्राय नोंदवावा आणि शेवटी तक्रार दाखल करावी.
दरम्यान, या प्रणालीमध्ये तक्रारीची सद्यस्थिती दाखवण्याची व्यवस्था आहे. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी तातडीने संबंधित शाखा अभियंता आणि उपअभियंता यांच्याकडे पाठवण्यात येतील. या माध्यमातून खड्डेमुक्त रस्ते करण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे.