ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 14 - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाचा आढावा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (एसआयटी) अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार यांनी मंगळवारी घेतला. पानसरे हत्येप्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याच्या विरोधात नव्वद दिवसांच्या आत दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी वीरेंद्र तावडे याला पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीने अटक केली होती. चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीमध्ये त्याच्याकडून महत्वाचे पुरावे गोळा करण्यात आले. या कालावधीत एसआयटी प्रमुख संजयकुमार हे पूण्यातूनच तपासासंबधी मार्गदर्शन करीत होते. तावडे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तावडेच्या अटकेनंतर पहिल्यांदाच ते कुटुंबासह ‘अंबाबाई’ व जोतिबा दर्शनासाठी रविवारी कोल्हापूर दौºयावर आले होते. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी त्यांची ‘रेसिडेन्सी क्लब’वर भेट घेऊन तपासासंबधी माहिती दिली. पानसरे हत्येतील दुसरा संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याच्या विरोधात नव्वद दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.