मुंबई : अनुदानासाठी शिक्षकांनी पुकारलेल्या आंदोलनाला शनिवारी काँग्रेसनेही पांठिबा जाहीर केला. दुसरीकडे वित्तमंत्री आणि शिक्षणमंत्र्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने केली. त्यामुळे शिक्षकांचे हे आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे.अनुदानासाठी शिक्षकांनी राज्यभर १ जूनपासून पुकारलेल्या आंदोलनाने पेट घेतला आहे. या आंदोलनात गजानन खरात या शिक्षकाचा नाहक बळी गेल्याने सर्व शिक्षक संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी शिक्षकांच्या कृती समितीला पाठिंबा घोषित केला, अशी माहिती शिक्षक सेलचे उपाध्यक्ष महादेव सुळे यांनी दिली. सुळे म्हणाले, अशोक चव्हाण मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी विनाअनुदानित पात्र शाळांना १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अमंलबजावणी अद्याप झाली नाही. विद्यमान मुख्यत्र्यांनी अनुदान देण्याचा शासन निर्णय तत्काळ जाहीर करावा.बारा आमदारांनी मुख्यमंत्र्याना घेराव घातला तेव्हा मुख्यमंत्र्यानी वित्तमंत्री व शिक्षणमंत्र्यांना अनुदानाचे आदेश जारी करावे, असे निर्देश दिले होते. मात्र याची पूर्तता झाली नाही. परिणामी एका शिक्षकाचा नाहक बळी गेला, असा आरोप प्रशांत रेडीज यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
‘वित्तमंत्री व शिक्षणमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
By admin | Published: June 12, 2016 4:07 AM