- रुपेश खैरी, वर्धा
पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर फिर्यादीला एफआयआरची प्रत तात्काळ देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्यास तक्रारदाराला त्याची प्रत मिळणे कठीण जाते. अशा वेळी तक्रारदाराला दाखल एफआयआरचा फोटो मोबाइलमध्ये घेण्याची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पोलीस प्रशासन अधिक पारदर्शक होण्याला साहाय्य होणार आहे.पोलीस विभाग आता आॅनलाइन झाला आहे. त्यामुळे एफआयआरची प्रतही तक्रारदाराला आॅनलाइन पाठविण्यात येते. तसेच पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारी थेट संगणकीकृत होत असल्यामुळे त्याची प्रत काढण्याकरिता प्रिंटरची गरज भासते. यात तांत्रिक अडचण आल्यास अनेकदा तक्रारकर्त्याला त्याची प्रत मिळणे कठीण जाते. वास्तविक तक्रारदाराला एफआयआरची प्रत मिळण्याचा अधिकार फौजदारी संहितेच्या कलम १५४ नुसार देण्यात आलेला आहे. त्यामुळे तक्रारदारांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला असून या संदर्भातील आदेश पोलीस महासंचालकांकडून प्राप्त झाल्याचे वर्धा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीची कॉपी मागितल्यास त्याला ती देणे बंधनकारक आहे. ती त्याला देताना काही अडचणी आल्यास शक्य असल्यास दाखल तक्रार फिर्यादीच्या व्हॉट्सअॅपवर पाठविणे किंवा फिर्यादीजवळ मोबाइल असल्यास त्याला दाखल होणाऱ्या तक्रारीचा फोटो काढण्याची मुभा देण्यात आली आहे. तशा सूचना पोलीस महासंचालकांकडून प्राप्त झाल्या आहेत.- अंकित गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक, वर्धा.