मुंबई: एखाद्या बिल्डरने फसवणूक केल्यास त्याच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात ‘मोफा’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. पोलीस महासंचालकांनी काढलेल्या या पत्रकानुसार गोरेगावच्या वनराई पोलीस ठाण्यात या कायद्यांतर्गत पहिला गुन्हा मंगळवारी दाखल करण्यात आला आहे.पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी याच महिन्यात मोफा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे परिपत्रक काढले होते. लोकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना चाप बसण्याकरता मोफा कायदा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार देशबन्धू गुप्ता, खुशीराम गुप्ता, नीलेश गुप्ता या त्यांच्या पार्टनर विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. यातील तक्रारदार प्रवीण अग्रवाल ‘हब मॉल प्रिमायसेस को आॅप सोसायटी लिमिटेड’चे सचिव आहेत. २००५ मध्ये त्यांनी या मॉलमधील ७५ टक्के गाळे विकत घेतले होते. मात्र गाळे विकल्याच्या सहा महिन्यानंतरही यांनी सोसायटी बनविली नाही. याउलट मॉल शेजारी ‘लोढा फिओरेन्ज’ नावाच्या तीन साठ मजली टॉवरचे काम सुरु केले. ज्याच्यासाठी आमचा दीड लाख स्क्वेअर फूट एफएसआय अनधिकृतपणे वापरला. याप्रकरणी आम्ही दोन वर्षांपूर्वी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. ‘एनओसी नसताना हा एफएसआय वापरल्याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला आहे. अधिक चौकशी सुरु आहे’, अशी माहिती वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुरव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)
मोफा अंतर्गत पहिला गुन्हा दाखल
By admin | Published: July 27, 2016 2:50 AM