गडचिरोली : एटापल्ली तालुक्याच्या सूरजागड डोंगरावर नक्षलवाद्यांनी ७६ ट्रकसह ७९ वाहनांची जाळपोळ केली होती. या प्रकरणी एटापल्ली पोलिसांनी महिला माओवादी नेता नर्मदाक्का आणि पेरमिली दलम कमांडर साईनाथ यांच्यासह सात नक्षलवाद्यांवर गुन्हे दाखल केले.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये गोंगलू, कोपा उसेंडी या नक्षल्यांचा समावेश आहे. गोंगलू हा कंपनी क्र. ४ चा कमांडर असून, या प्रकरणात त्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे कळते. या घटनेची गंभीर दखल केंद्र सरकारकडून घेण्यात आली असून, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर मंगळवारी गडचिरोलीत आले व त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कमांडर यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या ठिकाणी कोणतेही काम बंद पडू नये, अशा सूचनाही त्यांनी केल्या. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. गडचिरोली जिल्ह्यात पायाभूत सुविधांसह संवाद यंत्रणा बळकट करण्यावर भर द्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी केल्या. (प्रतिनिधी)
सात नक्षलींविरुद्ध गुन्हे दाखल
By admin | Published: December 30, 2016 1:50 AM