मुंबई/यवतमाळ : ‘सीएमओ’ अर्थात मुख्यमंत्री कार्यालयाकडे बदल्या, बढत्या व अन्य विषयांच्या शेकडो फायली गेल्या चार महिन्यांपासून तुंबल्या आहेत. तब्बल दहा महत्त्वाच्या खात्यांच्या कॅबिनेटचा कारभार मुख्यमंत्र्यांकडे असल्याने फायलींची ही गर्दी झाल्याचे सांगितले जाते.मुख्यमंत्र्यांकडे गृह, विधी व न्याय, सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती व जनसंपर्क, बंदरे, पर्यटन, माजी सैनिकांचे कल्याण, राजशिष्टाचार, रोजगार व स्वयंरोजगार अशा दहा प्रमुख खात्यांची जबाबदारी आहे. या सर्व खात्यांचे कॅबिनेटमंत्री तेच आहेत. परंतु सध्या या खात्यांच्या फायली मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहेत. त्यातही सर्वाधिक वाईट अवस्था ही गृह खात्यातील फायलींची आहे. तीन-चार महिन्यांपासून शेकडो फायली मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांच्या स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत पडून आहेत. मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी पोल १० व १२ येथे हेतुपुरस्सर फायली दडवून ठेवण्याचे प्रकारही पुढे आले आहेत. साध्या अर्जावरसुद्धा लिपिकापासून प्रधान सचिवापर्यंत स्वाक्षऱ्या होत असल्याने या फायली मंत्रालयातच सतत फिरत राहतात. प्रत्येक टेबलवर शंभरावर फायली आहेत. ‘व्यक्ती एक खाती अनेक’ या प्रकारामुळे हा गोंधळ वाढला. (लोकमत न्यूज नेटवर्क)का तुंबल्या फायली?विविध मंत्रालयांचा कारभार असताना व त्या खात्यांचा विस्तार मोठा असताना कामांची विभागणी केली गेली नाही. विनंती बदल्या, आपसी बदल्या, संवर्ग बदल, बढत्या अशा विविध फायलींवर गेल्या तीन-चार महिन्यांपासून स्वाक्षऱ्या झाल्या नाहीत. अधिकारी सुटीवर असणे, त्यांना सहायक नसणे यामुळेही या फायली पुढे सरकल्या नाहीत. एका टेबलवर गेलेली फाईल किमान दोन आठवडे पुढे सरकत नाही. त्यामुळे फायलींचा प्रवास मंदावला. भ्रष्टाचार कमी व्हावा या प्रामाणिक उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली असली तरी मात्र त्याला तडा जात आहे.शिफारसपत्रे तशीच..अनेक बदल्या, बढत्यांच्या अनुषंगाने राज्यातील सत्ताधारी व विरोधी आमदारांनी शिफारशी केल्या. मात्र त्यांच्या या शिफारशींनाही सचिवालयात किंमत नाही. त्यांच्या शिफारशी संबंधित फायलीत लागलेल्या आहेत. या फायलींवर स्वाक्षरीच न झाल्याने शिफारशींना अर्थ उरत नाही. नियमात बसणारी आणि जनतेला रिलिफ देणारी कामेही रखडल्याने आमदारांमध्ये नाराजी आहे. दिवाळीला गेलेले कर्मचारी परतलेच नाहीतमंत्रालयात कक्ष अधिकारी आहेत; मात्र त्यांचे सहायक नाहीत. दिवाळीनिमित्त सुटीवर गेलेले कर्मचारी परतले नाहीत. त्यामुळे मंत्रालयीन कामकाज थंडावले. सर्वच विभागांत कक्ष अधिकाऱ्यांची ही ओरड आहे. पोल १०च्या कक्ष अधिकाऱ्याला तर स्वत: टायपिंग करावे लागत आहे. त्यांच्या सहा सहायकांपैकी एक महिला कर्मचारी आजारी असून, अन्य पाच जण अद्याप सुटीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.‘सीएमओ’चे काय म्हणणे?गेल्या दहा दिवसांत इतर महत्त्वाच्या बाबी तसेच लंडन दौरा व अन्य कार्यक्रमांमधील व्यग्रतेमुळे मुख्यमंत्री फायलींचा निपटारा करू शकलेले नाहीत. दोन-तीन दिवसांवर फाईल प्रलंबित राहता कामा नये, याबाबत मुख्यमंत्री दक्ष असतात. त्यांनी दर महिन्याला सरासरी १२०० फायलींचा निपटारा केला. १२ महिन्यांत १४ हजार ४०० फायलींचा निपटारा त्यांनी केला. याआधीच्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत हा आकडा दुपटीने अधिक आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले.
‘सीएमओ’कडे तुंबल्या फायली!
By admin | Published: November 27, 2015 3:47 AM