अहमदनगर : शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तपदासाठी शिंगणापूरमधील नूतन गोरक्षनाथ शेटे या महिलेने गुरुवारी अर्ज भरला. या पदासाठी सहा महिला प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तपदावर काम करण्याची संधी मिळावी, यासाठी सध्या अनेकांची लगबग सुरू आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे जमा झाली असून, येत्या दोन दिवसांत अनेक जण अर्ज भरणार आहेत. आतापर्यंत अर्ज भरणारांची संख्या शंभराहून अधिक झाली असून, शेवटच्या दोन दिवसांत आणखी भर पडणार आहे. मागील वेळी काही महिलांनी अर्ज भरले, मात्र त्यांना संधी मिळाली नाही, असे अर्ज भरण्याची तयारी करीत असलेल्या महिलांनी सांगितले. परंतु, मागील वेळी एकाही महिलेने अर्ज भरला नव्हता, अशी माहिती विश्वस्तपदासाठी अर्ज भरलेल्या आदिनाथ बानकर यांनी दिली. दरम्यान, या वेळी द्वारका भूतकर, शालिनी लांडे, नंदा दरंदले, वैशाली बानकर आदी अर्ज भरण्याची तयारी करीत आहेत. यातील वैशाली बानकर यांचा आता अर्ज भरण्याचा विचार नसल्याचे त्यांच्या पतीने ‘लोकमत’ला सांगितले. (वार्ताहर)शनिदेवाच्या कृपेने विश्वस्तपदाचे काम करण्याची संधी मिळाल्यास महिला भाविकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ. मध्यंतरी जी घटना घडली, त्या वेळी महिला सुरक्षा रक्षक चौथऱ्यानजीक उपस्थित नव्हती. भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि येथील देवस्थानने घालून दिलेल्या रूढी आणि परंपरांचा सन्मान केला जावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केला जाईल, असे नूतन शेटे म्हणाल्या.
महिलेकडून अर्ज दाखल
By admin | Published: December 18, 2015 1:10 AM