मुंबई : औरंगाबादच्या रॅडिको या मद्य उत्पादन करणाऱ्या कंपनीने सोडलेल्या अतिविषारी पाण्यामुळे १५ कि.मी. परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे़ यासाठी या कंपनीचे संचालक चारुदत्त पालवे यांच्यासह आठही संचालकांवर गुन्हे दाखल करा आणि नि:पक्षपाती चौकशी करण्याची मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.संबंधित कंपनीविरुद्ध कठोर कारवाई करून शेतकऱ्यांचे नुकसान भरून द्यावे, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना नांदगावकर म्हणाले, की याआधी विषारी रसायनमिश्रित पाणी या नाल्यात सोडल्याप्रकरणी मनसेचे शहर अध्यक्ष सुमित खांबेकर यांना काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्या वेळीदेखील आम्ही योग्य ते पुरावे प्रशासनाकडे देऊन ही अटक बेकायदेशीर असल्याचे दाखवून दिले होते. आता प्रत्यक्षात विषारी घातक रसायनाचे पाणी कोण सोडते आहे, हे सिद्ध झाले आहे. शासनानेच चौकशी करून रॅडिकोचे उत्पादन थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापेक्षा जास्तीचा पुरावा कोणता हवा आहे? या कंपनीच्या संचालकांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळेच हे घडले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान तर झाले आहेच, शिवाय त्या भागातील जमिनीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. लोकांना या प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारासही कंपनी आणि कंपनीचे संचालक जबाबदार आहेत, असेही नांदगावकर म्हणाले. त्यामुळे सर्व संचालकांवर कठोर कारवाई करा. कोणता संचालक कोणत्या राजकीय नेत्याच्या जवळचा आहे याचा विचार करून जर कारवाई होणार असेल तर या सरकारला स्वत:ला नि:पक्ष म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, असेही नांदगावकर म्हणाले. कसलेही दबाव आले तरीही एकाही संचालकाला पाठीशी घालू नका, असेही त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)नांदगावकर यांनी आपल्या पत्रात मुंबईतील विषारी दारुमुळे १०० लोकांचे बळी गेल्याचाही उल्लेख केला आहे. औरंगाबादचे तहसिलदार रमेश मुंडलोड यांनी ५ जून रोजी प्रत्यक्ष पहाणी करुन पंचनामा केला आहे व रॅडिको कंपनीच हे पाणी सोडत असल्याचे पत्र नमूद केले आहे.
पालवे, संचालकांवर गुन्हे दाखल करा
By admin | Published: June 28, 2015 2:34 AM