नागपूर : कौटुंबिक कलहातून निर्माण झालेल्या वादानंतर नातेवाईकांसह सासरी आलेल्या सुनेने तिच्या सासूकडे धक्काबुक्की करून १३ लाखांची खंडणी मागितली. अन्यथा खोटी तक्रार करून फसविण्याची धमकी दिली. दीड वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशांवरून अंबाझरी पोलिसांनी प्रीती (३४) आणि तिच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.तक्रारदार महिला (५६) अंबाझरीत राहते. दोन वर्षांपूर्वी तिच्या मुलासोबत प्रीतीचा विवाह झाला होता. कौटुंबिक कलह वाढल्यानंतर प्रीती नवºयाचे घर सोडून माहेरी तेलंगणात निघून गेली. तिने कागज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून कागज पोलिसांनी कलम ४९८ अन्वये गुन्हा दाखल केला. त्याच्या तपासासाठी ८ आॅगस्ट २०१६ ला पोलीस तक्रारदार महिलेच्या अंबाझरीतील घरी गेले. या वेळी प्रीतीच्या रवींद्र नामक नातेवाईकाने तक्रारदार महिलेशी लज्जास्पद भाषा वापरली.गोपी दीपक तिबडा या व्यक्तीने केस सेटल करायची असेल, तर १३ लाख रुपये द्यावे लागतील. पैसे दिले नाही, तर पुन्हा दुसरी केस करून फसवण्याची धमकी दिली. या प्रकरणाची तक्रार त्या वेळी महिलेने अंबाझरी ठाण्यात नोंदविण्याचा प्रयत्न केला.मात्र, घरगुती वादाचे स्वरूप असल्याचे सांगून पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे फिर्यादी महिलेने कोर्टात धाव घेतली. कोर्टाने या संबंधाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यामुळे पोलिसांनी फिर्यादी महिलेची सून प्रीती आणि तिच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.त्यावरून अंबाझरी पोलिसांनी फिर्यादी महिलेचा विनयभंग करून, धाक दाखवणे, आदी आरोपाखाली गुन्हा दाखल केला. याबाबत तपास करून आरोपीविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
१३ लाख मागणा-या सुनेविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 3:27 AM