नांदगाव : कायदेशीर अधिकार नसतानाही अटी- शर्तीच्या जमिनींची खरेदी-विक्री करुन शासनाची तब्बल पावणेचार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येवल्याच्या उपविभागीय अधिकारी वासंती माळी, नांदगावचे तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन व इतर नऊ शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांखेरीज १२ खासगी व्यक्तींविरुद्ध नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.एकाच वेळी एकाच प्रकरणात ११ महसुली अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई होण्याची ही बहुदा पहिलीच घटना असावी. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक हेमंतकुमार भामरे यांनी गुरुवारी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या ११ तुकड्यांनी गुरूवारी संबंधित लोकसेवकांच्या घरांवर धाडसत्र सुरु केले असून रात्री उशीरापर्यंत कारवाई सुरू होती. पोलिसांकडील फिर्यादीत २३ जणांची नावे असली तरी त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.नवीन अविभाज्य शर्तीच्या भोगवटादार वर्ग २ या जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार करताना शासनाची व पर्यायाने विभागीय आयुक्तांची अनुमती घेणे बंधनकारक असताना महाजन यांनी आपल्याच अखत्यारीत अशा जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांना अनुमती दिल्याची व शासनाच्या आर्थिक नुकसानीस संबंधित आरोपी जबाबदार असल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. (प्रतिनिधी)
जमीन घोटाळ््याप्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
By admin | Published: January 06, 2017 4:08 AM