ग्रामीण पोलीस अधीक्षकांची माहितीपुणे सोशल मिडीयामधून महापुरूषांविषयी बदनामीकारक प्रसारण झाल्यानंतर ते इतरांना प्रसारित करणार्यांवर,लिंक पाठविणार्यांवर सुद्धा गुन्हे दाखल केले जातील,अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी आज पत्रकारांना सांगितली.तणाव निर्माण करणार्या घटनंाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने आज सर्वधर्मीय, सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन केले होते.शांतता समितीच्या बैठकीनंतर लोहिया, जिल्हाधिकारी सौरव राव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.लोहिया म्हणाले की तणावग्रस्त स्थितीत दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत योग्य कारवाई केली जाणार आहे.मात्र सोशल मिडियावर जो बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध होतो,त्याचा सर्व्हर अमेरिकेत असतो.या मजकुराच्या लिंक वाढतात.त्यांना आवर घालणे अशक्य होते.मात्र अशा लिंक्स ज्या व्यक्ती इतरांना पाठवतील,त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत.अशा गुन्ह्यांमध्ये ३वर्षे शिक्षेची तरतूद आहे.ज्यांनी दगडफेक करून सरकारी, खासगी वाहनांचे, मालमत्तांचे नुकसान केले आहे, अशांकडून भरपाई करून घ्यावी असा सूर या बैठकीत व्यक्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी राव यांनी नुकसान भरपाईची कारवाई सुरू करू, असे आश्वासन दिले.शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र खराडे यांनी पंधरा ते पंचवीस वयोगटातील मुलांकडे मोबाईल असतात.त्यामुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रबोधन केले जावे, अशी मागणी केली.छाजेड आणि माळवदकर यांनी जेथे हिंसक प्रकार होतील तेथे मान्यवर नेत्यांना पाचारण करून संतप्त लोकांचे मन वळवावे, असे आवाहन केले.अशा परिस्थितीत अफवा पसरविल्या जातात.मालमत्तेचे नुकसान केले जाते.छोट्या कारणांवरून प्रक्षुब्ध होऊन हिंसाचार केला जातो,असे सांगून राव यांनी असे प्रकार होऊ नयेत, असे आवाहन केले.दरम्यान, महापुरूषांची फेसबुकवर बदनामी होण्याच्या प्रकारात ग्रामीण व शहरी भागात ११२गुन्हे दाखल झाले असून ४६लाख७८हजार रूपये किंमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे,अशी माहिती बैठकीच्या प्रारंभी सांगण्यात आली.यापेक्षा नुकसानीची रक्कम अधिक असू शकते.पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारींच्या संख्येवरून हा आकडा काढण्यात आला आहे, असे सांगण्यात आले.२०गावांमध्ये बंद पाळण्यात आला.६ठिकाणी रस्ता रोखा आंदोलने झाली.जाळपोळ, दगडफेक,दहशतीच्या घटना झाल्या.विविध ठिकाणच्या शांतता समित्यांच्या ५२बैठका झाल्या, असे सांगण्यात आले. पुणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी चंद्रशेखर दैठणकर यांच्यासह विविध स्तरांमधील अधिकारी,काँग्रेसचे शहर अध्यक्ष अभय छाजेड,पुणे पालिकेतील शिवसेनेचे गटनेते श्याम देशपांडे,भाजपचे गटनेते अशोक येनपुरे,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप कंद,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविंद्र माळवदकर, तालुका स्तरावरील शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
बदनामीकारक लिंक्स पाठविणार्यांवरही गुन्हे दाखल होणार
By admin | Published: June 10, 2014 10:40 PM