ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - महाडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे जोरदार पडसाद बुधवारी विधानसभेमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या दुर्घटनेसाठी राज्य सरकारला जबाबदार ठरवत याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर हत्येचा (३०२) गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली.
या दुर्घटनेला सरकारचा बेजबाबदरपणा कारणीभूत असून, नवीन पुलावरुन वाहतूक सुरु असताना जुन्या पुलावरुन वाहतूक बंद का केली नाही ? असा सवाल अजित पवार यांनी विचारला. तसेच या घटनेची न्यायायलयीन चौकशी करून कठोर कारवाई करा अशीही मागणी केली.
पाऊस नव्हता तेव्हा पाण्यासाठी हाल आणि आता पाणी आहे तर कुठले नियोजन नाही. सर्व आघाडयांवर सरकार अपयशी ठरत असून सरकारकडे कुठलेही नियोजन नाही असा आरोप अजित पवार यांनी केला. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिलेला असतानाही कोणतीही खबरदारी का घेतली नाही, वाहतूक का थांबवली नाही असा सवालही त्यांनी विचारला. दरम्यान काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली.
या आरोपांना सरकारच्यावतीने उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंधरा मिनिटात प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असा दावा केला. एनडीआरएफच्या चार टीम्स घटनास्थळी रवाना झाल्या असून, तटरक्षक दलाच्या हॅलिकॉप्टरच्या मदतीने मदतकार्य सुरु असल्याचे सभागृहाला सांगितले.