ठाणे : येत्या महिनाभरावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. परंतु, शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळातही हीच परिस्थिती राहू शकते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याचे आदेश स्थायी समिती सभापती संजय वाघुले यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले आहेत. रविवारी झालेल्या मुसळधार पावसात घोडबंदरच्या अनेक भागांत पाणी साचले होते. तर, या भागातील मोठ्या गृहसंकुलांच्या आवारातील परिसर जलमय झाला होता. दीड ते दोन फूट पाणी साचल्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. याच मुद्यावरून बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा सुरू असतानाच काही सदस्यांनी शहरातील अनेक भागांतील रस्त्यांवर खड्ड्यांच्या मुद्याला हात घातला. घोडबंदर भागात सेवारस्त्यांवर तयार करण्यात आलेले नवे कोरे रस्ते उखडले असून या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. तसेच शहरातील अन्य भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे ठाणेकरांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत असल्याचे सांगत सदस्यांनी प्रशासनाच्या कारभारावर टीकेची झोड उठवली. तसेच गणेशोत्सव एक महिन्यावर येऊन ठेपला असल्याने त्यापूर्वी शहरातील खड्डे बुजवण्याची मागणी केली. दरम्यान, घोडबंदरच्या सेवारस्त्यांवर खड्डे पडल्याचे प्रशासनाने मान्य केले. त्याचे कारणही स्पष्ट केले. >विकासकामांमुळे पडले खड्डे कापूरबावडी ते पातलीपाड्यापर्यंतच्या सेवारस्त्याचे काम चार वर्षांपूर्वी केले होते. तर, पातलीपाडा ते गायमुखपर्यंतच्या सेवारस्त्याचे काम चार महिन्यांपूर्वी करण्यात आले. चार वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्याखाली मलनि:सारण वाहिन्या टाकण्याचे तर चार महिन्यांपूर्वी बांधलेल्या रस्त्याशेजारी स्लॅब कल्व्हर्टचे काम करण्यात आले. यामुळे या दोन्ही रस्त्यावर खड्डे पडल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. प्रशासनाने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर सदस्यांचे समाधान झाले आणि त्यांनी गणेशोत्सवापूर्वी शहरातील खड्डे बुजवण्याची मागणी लावून धरली. अखेर, सभापती वाघुले यांनी शहर खड्डेमुक्त करण्याचे आदेश दिले.
गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्डे भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2016 3:14 AM