मुंबई : कोरोनामुळे साधारणत: दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळांतील किलबिलाट पुन्हा सुरू होणार आहे. १ डिसेंबरपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग आणि शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा नियमित सुरू होतील.शाळा सुरू करण्याच्या निर्णयाची माहिती देताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करताना सर्व प्रकारची काळजी घेण्यात येईल. तसेच पालकांच्या परवानगीनेच या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाईल. शाळेच येण्याचे बंधन विद्यार्थ्यांवर नसेल. इयत्ता पाचवीच्या पुढील वर्ग सुरू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला. त्यानुसार ग्रामीण भागात ५वी ते १२वी तर शहरी भागात ८वी ते १२वीच्या शाळा-महाविद्यालये सुरू झाली. त्यानंतर ग्रामीण भागात पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा विचार सुरू होता. यासाठी आरोग्य विभाग, मुख्य सचिवांचा अभिप्राय घेतला होता. बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सशी चर्चाही केली होती. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
शालेय शिक्षणमंत्री म्हणाल्या...- मुलांचे कुठेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची काळजी घेतली जाईल.- मुलांना एकत्र बसून शिक्षण घेण्याची आवश्यकता तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यानुसार चर्चा करून निर्णय घेतला. पालक आणि शिक्षकांशीही चर्चा करण्यात आली.- मुलांना सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण वातावरण मिळेल, याची काळजी घेतली जाईल. शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी पुढील सहा दिवस विशेष प्रयत्न केले जातील.