गौरीशंकर घाळे, मुंबईवाढीव चटई क्षेत्र निर्देशांच्या मोबदल्यात घरांचा साठा (हाउसिंग स्टॉक) की अधिमूल्य (प्रीमियम) या वादात रखडलेला मुंबईतील ५६ म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पुनर्विकासात म्हाडाला द्यावयाच्या हाउसिंग स्टॉकच्या अटीतून बिल्डरांची मुक्तता करण्यात आली असून, अधिमूल्य आकारून पुनर्विकासासाठी वाढीव एफएसआय देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासामध्ये आता रहिवाशांना किमान ३०० चौरस फुटांऐवजी ३७६ चौरस फुटांची घरे उपलब्ध होणार आहेत. म्हाडाच्या दोन हजार चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडावरील वसाहतींच्या पुनर्विकासासाठी तीन एफएसआय (चटई क्षेत्रफळ निर्देशांक) देताना म्हाडाला ‘हाउसिंग स्टॉक’ देण्याची अट वगळण्यात आली आहे. तसेच एक एफएसआय वाढवून देण्यात आला आहे. शिवाय जिथे चार हजार चौरसमीटर किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळाचे भूखंड आहेत, अशा भूखंडांवरील इमारतींना पुनर्विकासासाठी अधिमूल्य आकारून तीन एफएसआय मिळेल. चार एफएसआय हवा असल्यास तीन एफएसआयच्या पुढील एक एफएसआयमधून निर्माण होणारी घरे ही म्हाडाच्या लॉटरीसाठी ‘हाउसिंग स्टॉक’ म्हणून द्यावी लागतील. याबाबतचा सुधारित आदेश गुरुवारी जारी करण्यात आला. म्हाडाच्या ५६ वसाहतींमध्ये ३ हजार ७०१ इमारती असून या इमारतींमध्ये सुमारे २ लाख रहिवासी वास्तव्य करत आहेत. मुंबईत प्रामुख्याने विक्रोळी, गोरेगाव, चारकोप, चेंबुर, गोराई आदी भागांमध्ये या वसाहती आहेत.मुंबईत ‘हाउसिंग स्टॉक’ तयार करण्याच्या उद्देशाने म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासात वाढीव एफएसआयसाठी केवळ अधिमूल्याऐवजी ‘हाउसिंग स्टॉक’ची अट टाकण्यात आली होती. २०१३ साली एफएसआय अडीचवरून तीन करण्यात आला होता. मात्र ‘हाउसिंग स्टॉक’ची अट व्यवहार्य नसल्याचे सांगत अनेक विकासकांनी पुनर्विकासाचे प्रस्ताव सादर करणे बंद केल्यामुळे पुनर्विकास प्रक्रिया ठप्प झाली होती. शिवसेना आणि विकासकांच्या विरोधानंतरही ‘हाउसिंग स्टॉक’ची अट कायम राहिल्याने म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास रखडला होता. त्यावर म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी झेंडे यांनी तीन इतके चटई क्षेत्रफळ घेतल्यास अधिमूल्य आकारावे आणि चार इतके चटई क्षेत्रफळ घेतल्यास एक चटई क्षेत्रफळाइतकी घरे बांधून म्हाडाला सुपुर्द करावीत, असा नवा प्रस्ताव सरकारला सादर केला होता. आता रहिवाशांनाही किमान ३७६ चौ. फुटांची घरे मिळतील. या प्रस्तावानुसार महापालिकेच्या प्रस्तावित विकास आराखड्यातही म्हाडा वसाहतींसाठी चार चटई क्षेत्रफळ निर्देशांक लागू करण्यात आला आहे. म्हाडाच्या ५६ वसाहतींचा पुनर्विकास वाढीव चटई क्षेत्रफळामुळे मार्गी लागणार असेल तर उत्तम आहे. मात्र यात खासगी विकासकांचे उखळ पांढरे होणार नाही; याची खबरदारी घेतली पाहिजे. म्हाडाला अधिकाधिक घरे मिळण्यासह रहिवाशांना वाढीव चटई क्षेत्रफळाच्या घरांसह लॉटरीमधील घरे वाढतील यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.- सुरेंद्र मोरे, अध्यक्ष, मुंबई उपनगर जिल्हा हाउसिंग फेडरेशन
पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
By admin | Published: January 06, 2017 4:46 AM