लोकमत न्यूज नेटवर्कपाटण/कोयनानगर (जि. सातारा) : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलेल्या कोयना परिसरातील महाप्रलंयकारी भूकंपास रविवारी ५५ वर्षे पूर्ण होत आहेत. दि. ११ डिसेंबर १९६७ च्या काळरात्रीने हजारो घरे बेचिराख करीत संसार उद्ध्वस्त केले.
शेकडो निष्पापांना आपला जीव गमवावा लागला होता. आजही या कटू आठवणीने थरकाप उडतो; मात्र ५५ वर्षांत या भूकंपाच्या भेगा बुजल्या; पण जखमा अजूनही भळभळत आहेत. कोयनानगर येथील तीन मंदिरांत प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत भूकंपामध्ये मृत पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
कोयना भागासह पाटण तालुक्यातील अनेक गावांना दि. ११ डिसेंबर १९६७ रोजी पहाटे ४ वाजून २१ मिनिटांनी बसलेल्या ६.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरवून टाकले होते. कोयना भागासाठी ही काळरात्र ठरली. या भूकंपाच्या धक्क्याने १८५ जणांनी प्राण गमावले.