राज चिंचणकर,
मुंबई- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात यंदा सत्तांतर झाल्यानंतर, आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेत, महामंडळ आता कात टाकण्याच्या मार्गावर आहे. त्यानुसार, महामंडळाचा चेहरामोहरा नजीकच्या काळात बदलण्याचे संकेत मिळत आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष व संचालकांनी चित्रपट महामंडळ ‘हाय-टेक’ होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.चित्रपट महामंडळाच्या अलीकडेच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांनी, महामंडळाचा कारभार नेटाने पार पाडण्यास सुरुवात केली आहे. आधुनिकीकरणाची कास धरत, महामंडळ लवकरात लवकर डिजिटल कसे होईल, याकडे लक्ष पुरवण्यात येणार आहे. महामंडळाचा ‘यू-ट्युब चॅनल’सुद्धा निर्माण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रभर पसरलेल्या महामंडळाच्या २५ हजार सदस्यांना एकत्र आणून त्यांना एकमेकांशी संलग्न करण्यात येणार आहे. महामंडळाच्या सदस्यांशी थेट संपर्क निर्माण होण्याच्या दृष्टीने मुंबई, पुणे, कोल्हापूर व नाशिक येथे जाऊन, महामंडळाचे १४ संचालक तिथल्या सदस्यांच्या अपेक्षा जाणून घेणार असल्याची माहिती, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली आहे.‘महामंडळाच्या हितासाठी सदैव कार्यरत राहू,’ असे स्पष्ट करत, त्यांनी भविष्यकालीन उपक्रमही जाहीर केले आहेत. या अंतर्गत नोव्हेंबर महिन्यात कोल्हापूर किंवा मुंबई येथे महामंडळातर्फे देण्यात येणारे ‘चित्रकर्मी’ व ‘चित्रभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, तसेच पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पुण्यात चित्रपट संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. २५ वर्षांहून अधिक वर्षे चित्रपटसृष्टीत कार्यरत असणाऱ्या व वयाची ६० वर्षे पूर्ण केली आहेत, अशा कलावंतांना महामंडळ सन्माननीय सभासदत्व बहाल करणार आहे. महामंडळाच्या सदस्यांशी थेट संपर्क निर्माण होण्याच्या दृष्टीने मुंबई, पुणे, कोल्हापूर व नाशिक येथे जाऊन, महामंडळाचे १४ संचालक तिथल्या सदस्यांच्या अपेक्षा जाणून घेणार असल्याची माहिती मेघराज राजेभोसले यांनी दिली आहे.