औरंगाबाद : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या बहुचर्चित प्रेमकथेवर आधारित ‘एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट तयार करण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये सुरुवात झालेल्या या प्रेमकथेवरील चित्रपटाचे सोमवारी बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी येथे चित्रीकरण करण्यात आले.धोनी व साक्षी रावत यांच्या भेटीचे चित्रिकरण रविवारी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट (आयआयएचएम) येथे झाले. चित्रपटात धोनीची भूमिका अभिनेता सुशांतसिंह राजपूत व साक्षी रावतची भूमिका अभिनेत्री कायरा अडवाणी साकारत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पांडे करीत आहेत. चित्रपटाची संपूर्ण टीम शनिवारीच औरंगाबादेत दाखल झाली. आयआयएचएम महाविद्यालयात धोनीची प्रेयसी साक्षी रावतने २००८-१० या काळात हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला. त्याच काळात धोनी औरंगाबादला येत होता. हे प्रेमीयुगुल कधी रिक्षाने शहरात सैरसपाटा करीत, तर कधी बीबी का मकबऱ्यात फेरफटका मारत. निवांत गप्पा मारण्यासाठी ते औरंगाबाद लेणीवरही जात असत. चित्रपटाच्या कथेनुसार औरंगाबादेत चित्रीकरण करण्याचा निर्णय दिग्दर्शक पांडे यांनी घेतला आहे. सोमवारी सकाळी बीबी का मकबरा परिसरात चित्रीकरण सुरू होते. येथील चित्रीकरण संपल्यावर चित्रपटाची संपूर्ण टीम हनुमान टेकडीवर पोहोचली. टेकडीवरही धोनीचे प्रेम कशा पद्धतीने बहरले याचे सविस्तर चित्रीकरण करण्यात आले. अभिनेता सुशांतसिंह तरुणाईच्या गळ्यातील ताईत असल्याने त्याला पाहण्यासाठी तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. गर्दीला आवर घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
धोनीच्या प्रेमकथेचे चित्रीकरण
By admin | Published: October 06, 2015 4:41 AM