औरंगाबाद : ‘फॅन’ या चित्रपटातील गाणे थिएटरमध्ये न दाखविल्याप्रकरणी निर्माता आदित्य चोप्रा यांच्या विरोधातील अपील राज्य ग्राहक तक्रार आयोग, औरंगाबादचे सदस्य एस.एम. शेंबोळे आणि के.बी. गवळी यांनी दाखल करून घेतले आहे. मात्र, सिनेदिग्दर्शक मनीष शर्मा, शाहरुख खान आणि पीव्हीआर सिनेमा यांच्याविरुद्धचे अपील आयोगाने फेटाळले आहे.स्टॅन्फर्ड शाळेतील शिक्षिका अफ्रीन फातिमा यांच्यासह कुटुंबातील ७ जण १५ एप्रिल रोजी ‘फॅन’ चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले होते. मात्र यापूर्वी सर्व टीव्ही चॅनल्सवर दाखविलेले ‘जबरा फॅन’ हे गाणे प्रत्यक्ष चित्रपटात दाखविले नाही. त्यामुळे आफरीन व त्यांची दोन मुले अतिशय निराश झाली. म्हणून त्यांनी याविरुद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल केली होती. ती मंचाने फेटाळली. त्याविरुद्ध त्यांनी अॅड. अली झिशान झैदी यांच्यामार्फत राज्य आयोगाकडे अपील दाखल केले होते.सुरुवातीस आयोगाने अपिलाच्या अनुषंगाने आदित्य चोप्रा, मनीष शर्मा आणि शाहरुख खान यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार तिघांचे वकील आयोगासमोर हजर झाले. उभय पक्षांच्या युक्तिवादानंतर आयोगाने वरीलप्रमाणे आदेश दिला. अपिलावर २७ आॅक्टोबर २०१६ रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)
चित्रपट निर्माता आदित्य चोप्राविरुद्ध अपील दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2016 12:46 AM