बारामतीमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असेल, बदलणार का? यावर सुप्रिया सुळे यांनी याचे उत्तर मी कसे देणार, त्यांनाच हा प्रश्न विचारावा, असे सांगत विजय शिवतारेंचे आव्हान हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले आहे. व्यापारी मेळाव्यासाठी धमक्या दिल्याची बातमी मी चॅनेलवर पाहिली होती. लोकशाहीत धमकी प्रकरण कोणी करू नये, असा टोलाही सुळे यांनी अजित पवार यांना लगावला.
तसेच मविआच्या जागावाटपावर बोलताना सुळे यांनी आमच्याकडे सिक्रेट काही नाही. उद्या जागावाटप जाहीर होईल. संध्याकाळी महाविकास आघाडीची एक बैठक होईल यातून वंचित आघाडीबाबतचे सगळे चित्र स्पष्ट होईल, असे सुळे यांनी स्पष्ट केले.
बारामतीसह राज्याच्या अनेक भागात पाणी दुष्काळ असे गंभीर प्रश्न आहेत. माझ्यासाठी दुष्काळी परिस्थिती ही सगळ्यात मोठ आव्हान आहे. सरकारने इतर वाऱ्या बंद करून अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे. शरद पवारांनी कधीही सुडाच राजकारण केलं नाही. त्यामुळे लोक पक्षात येत असतील, त्यांचे स्वागत आहे, असे सुळे म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस जर माझ्या मतदार संघात आले तर त्यांचे स्वागत होईल. राज्यातील जनतेला त्यांनी चांगले काहीतरी द्यावे, ही अपेक्षा आहे. सीट जाहीर होत नाही त्यामुळे मी बारामती लोकसभा मतदारसंघात येत आहे. राज्यात महाविकास आघाडी 48 जागा लढवणार आहे, असेही सुळे म्हणाल्या.