लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विद्यापीठ परिक्षांवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ताठर भूमिका घेतली आहे. परीक्षा रद्द करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा अनपेक्षित आणि प्रथेला धरून नाही. शिवाय, या निर्णयाचे परिणाम आणि कायदेशीर बाबींचा सर्वंकष विचार झालेला नाही, असे सांगतानाच कुलपतीच परीक्षांबाबत अंतिम निर्णय घेतील, असे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे पत्रच मंगळवारी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिक्षा आणि शैक्षणिक वर्षाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व कुलगुरुंची समिती नेमली होती. या समितीने ६ मे रोजी आपला अहवाल विभागाच्या सचिवांना सादर केला आहे. हा अहवाल अजूनही कुलपती या नात्याने कुलपतींना सादर करण्यात आलेला नाही. विशेष म्हणज,े व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या बैठकीत राज्यातील सर्व कुलगुरूंनी आपापल्या परीक्षा घेण्याची तयारी दर्शवली होती, याची आठवणही राज्यपालांनी करुन दिली. परिक्षेबाबत या समितीच्या अहवाल आपल्याला सादर झाल्यानंतरच या अहवालातील सर्व शिफारशी अथवा काही स्वीकारून निर्देश जारी केले जातील, असे राज्यपाल कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी परीक्षा रद्द करण्याची केलेली घोषणा ही पदवी परीक्षेबाबतच्या मुलभूत सुत्राला हरताळ फासणारी आहे. एकाच प्रकारची पदवी मिळविण्यासाठी दोन प्रकारचे, वेगवेगळे नियम असू शकत नाहीत. एकाने परिक्षा द्यायची आणि दुसऱ्याने सरासरीच्या आधारे पदवी मिळवायची, असा भेद करता येणार नाही. परीक्षेला पर्यायी प्रक्रिया ठरविता येणार नाही, असेही राज्यपालांनी आपल्या पत्रात नमूद केले.
वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी अशा विविध शाखांतील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संबंधित व्यवसायातील मंडळात नोंदणी करावी लागते. परीक्षा झाली नाही तर या संस्था अशा विद्यार्थ्यांना स्वीकारणार नाहीत. त्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यता येईल, याकडेही राज्यपालांनी लक्ष वेधले आहे.मुख्यमंत्र्यांच्या उत्तराची प्रतिक्षाराज्यपाल हे राज्यातील विद्यापीठांचे कुलपतीदेखील आहेत. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाशी संबंधित सर्व निर्णयांचे अंतिम अधिकार हे कुलपतींकडे आहेत. याच कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून विद्यापीठ परिक्षांबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. असे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. आता मुख्यमंत्री ठाकरे काय उत्तर देतात याची प्रतिक्षा आहे.